महापालिकेने कितीही छातीठोकपणे सांगितले तरी पावसाळ्यात मुंबईतील रस्ते खड्डय़ांत जाण्याची परंपरा कायम आहे. मंडळे आणि मूर्तीकारांनाही या खड्डय़ांचा त्रास होतो. मात्र हा त्रास दरवर्षीचाच असतो. त्यामुळे खड्डा आला की त्याच्यावर पोलादी पत्रा टाकून त्यावरून मूर्तीची ट्रॉली नेण्याचा उपाय अखेर मंडळांनीच शोधून काढला आहे. आता खड्डे उदंड झाले असून खड्डे बुजवता येत नसतील तर किमान ते झाकण्यासाठी पोलादी पत्रे मूर्तीकार व मंडळांकडून पालिकेला केली जात आहे.
मुंबईतील बहुतांश मंडळांमध्ये एक दोन आठवडे आधीच मूर्तीचे आगमन होते. मात्र पालिकेने अजूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास घेतलेले नाहीत. त्याचा त्रास मंडळांसोबत मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांनाही होत आहे. एखादी मूर्ती भंगल्यास त्याची जबाबदारी मूर्तीकारांवर येते. त्यामुळे खड्डे बुजवता येत नसतील तर किमान खड्डय़ांवर टाकण्यासाठी पोलादी फळ्या पुरवा, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. मालवणी येथे मूर्तीशाळा असलेले परेश कारेकर म्हणाले की दरवर्षी खड्डय़ांची समस्या असते. यावर्षी मीठचौकी तसेच लिबर्टी गार्डन परिसरात रस्त्यांची चाळणच झाली आहे. माझ्या कारखान्यातून अनेक मूर्ती या रस्त्यांवरून जातात. महापालिकेने आम्हाला पोलादी फळ्या पुरवल्या तर त्या परत घेण्याची जबाबदारीही आम्ही घेऊ. पालिकेने २३ ऑगस्टची मुदत दिली आहे. मात्र त्या मुदतीत रस्त्यांचे काम होण्याची शक्यता कमी वाटते, असेही त्यांनी सांगितले.
साधारणपणे दहा बाय दहा फूट ट्रॉलीला चार चाके असतात. या चाकांमध्ये आठ फुटांचे अंतर असते त्यामुळे ट्रॉलीचा तोल सांभाळणे कठीण होते. त्यातच खड्डय़ात चाक अडकले तर ते बाहेर काढणे कठीण होते. ट्रॉलीचा तोल ढळून मूर्तीला अपाय होण्याचा धोका असतो. त्यामुळे खड्डे आल्यास किंवा रस्ता खडबडीत असल्यास तिथे गोणपाट टाकण्यासारखे उपाय पूर्वी केले जात. गेल्या काही वर्षांत त्यावर पोलादी फळ्यांचा उतारा शोधण्यात आला आहे.
प्रत्येक मंडळाला पोलादी फळ्यांचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे मूर्तीकारांना काही फळ्या दिल्यास त्या मंडळांना वापरता येतील. पालिकेने सुमारे शंभर मूर्तीकारांकडे अशा फळ्या द्याव्यात, अशी मागणी करणारे पत्र आम्ही आयुक्त सीताराम कुंटे यांना देत आहोत, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर म्हणाले.

स्टीलच्या ट्रॉलीचे गणित
ट्रॉलीच्या चाकाच्या व्यासानुसार पोलादी फळ्यांचा आकार असावा लागतो. साधारण दोन फूट व्यासाच्या चाकासाठी दोन बाय दोन फूट व्यासाची फळी लागते. मूर्तीच्या वजनानुसार या प्लेटची जाडी पाच ते आठ मिमी असते. एका चौरस फूट फळीचे वजन सुमारे ४ किलो असते. त्यामुळे दोन बाय दोन फुटाच्या प्लेटचे वजन १५-१६ किलोपर्यंत जाते. पोलादाचा भाव पाहता या फळीची किंमत सहा हजार रुपयांपर्यंत जाते, अशी माहिती मूर्तीकार तुकाराम राऊत यांनी दिली.