लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्रित आणण्यासाठी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप काळानुरूप बदलत गेले. उत्सवात उथळपणा आणि भव्यतेला महत्त्व आले. बदलत्या प्रवाहात ‘जुनं ते सोनं’ म्हणत काही मंडळांनी आजही भव्यतेपेक्षा कल्पकतेला महत्त्व देत सामाजिक प्रबोधनाकडे कल ठेवला आहे. कळवण शहरातील कृष्णा फ्रेंड्स सर्कल, हे त्यापैकीच एक. चार वर्षांपासून मंडळ सामाजिक संदेश देणारे जिवंत देखावे सादर करत समाजप्रबोधनाचे काम नेटाने करत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग नोंदवत सामाजिक बांधीलकी जोपासण्याच्या उद्देशाने २६ वर्षांपूर्वी कळवण शहरातील व्यावसायिक व व्यापारी मंडळी एकत्र आली. परस्परांच्या आवडीनिवडी जपत तयार झालेला हा चमू ‘कृष्णा फ्रेंड्स सर्कल’ म्हणून ओळखला जाऊ लागला. मंडळाने सलग २२ वर्षे विविध कृत्रिम देखावे साकारले. मात्र, त्यातील कृत्रिमतेला कंटाळून काही नवीन करायचे या ऊर्मीने मंडळाचे अध्यक्ष दीपक वेढणे यांनी चार वर्षांपूर्वी कार्यकारिणीसमोर ‘जिवंत देखावे’ सादर करण्याची संकल्पना मांडली. कृ त्रिम देखाव्यांसाठी येणारा खर्च, त्यासाठी होणारी ओढाताण लक्षात घेऊन मंडळाने लोककला तसेच कलावंतांना मिळणारे हक्काचे व्यासपीठ याचा विचार करून या संकल्पनेला एकमताने पाठिंबा दिला. वेढणे स्वत: लेखक असून दिग्दर्शनासह अन्य तांत्रिक बाजू ते सांभाळतात.
कृत्रिम देखाव्यांच्या झगमगाटातून बाहेर पडत मंडळाने जिवंत देखाव्यांवर लक्ष केंद्रित केले. पहिल्या वर्षी वृद्धापकाळात आई-वडिलांना होणारा त्रास, त्यांच्या भावनिक तसेच शारीरिक अपेक्षांवर भाष्य करणारी ‘आम्ही कुणाकडे पाहायचे?’ ही लघुनाटिका सादर केली. दुसऱ्या वर्षी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेवर, तिसऱ्या वर्षी भारत-पाक युद्धावर आधारित ‘माँ तुझे सलाम’ ही लघुनाटिका सादर केली. या उपक्रमासाठी मंडळाने तिन्ही वर्षे नाशिक येथील नाटय़ शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या नवोदित कलाकार मंडळींना मानधनावर आमंत्रित केले.
जिवंत देखाव्याला मिळणारा प्रतिसाद पाहून मंडळाने चौथ्या वर्षी स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्याचे निश्चित केले. त्यानुसार महिनाभर आधीच २५ ते ६० वयोगटातील कलाकारांची निवड करून त्यांना रंगीत तालीम दिली. पुढील काळात स्थानिक कलाकारांची परंपरा कायम राहणार असल्याचे वेढणे यांनी सांगितले. यंदा मंडळाने बदलत्या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनावर होणाऱ्या दूरगामी परिणामांवर ‘मानवी जीवन दिशा, दशा आणि व्यथा’ ही नाटिका सादर केली आहे. २० मिनिटांच्या या नाटिकेचे दररोज पाच ते सहा प्रयोग होतात. गणेशोत्सवादरम्यान ५० हजाराहून अधिक गणेशभक्त त्याचा आस्वाद घेतात.
पुढील वर्षी नवोदितांना संधी देताना जुन्या चेहऱ्यांनाही सामावून घेतले जाईल. स्थानिक कलाकारांना मानधनाऐवजी वेगळ्या स्वरूपात त्यांचा सन्मान केला जाणार असल्याचे वेढणे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ५१ सदस्य असलेले कृष्णा फ्रेंड सर्कल कोणाकडून कुठलीच देणगी घेत नाही. प्रत्येकी २१०० ते २५०० रुपयांदरम्यान सदस्यांकडून निधी गोळा करत मंडळाचा कार्यभार चालविला जातो. त्यात गणेशोत्सवातील खर्चासह काही सामाजिक उपक्रमांवर खर्च केला जातो. त्यात प्रामुख्याने लगतच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मंडळाकडून शैक्षणिक साहित्य तसेच अन्नधान्य पुरविण्याचा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून बापू कुमावत काम पाहत असून कायमस्वरूपी कार्याध्यक्ष म्हणून सुहास भावसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे जिवंत देखावे प्रत्येकाच्या मनाला साद घालत आहेत. विषयही असे हाताळले जातात की, पाहणाऱ्याला विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.