गणेश आगमन व विसर्जन मार्गातील खड्डय़ांचे विघ्न दूर करण्याबाबत दिलेले आश्वासन अपेक्षेप्रमाणेच पालिका प्रशासनाने पाळलेले नाही. ‘करून दाखविले’ची टिमकी वाजविणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेलाही नेहमीप्रमाणेच त्याचे काहीच सोयरसुतक नाही. परिणामी विघ्नहर्त्यांच्या वाटेतील खड्डय़ांचे विघ्न अखेर दूर झालेच नाही. परिणामी पृथ्वीवरील १० दिवसांचा मुक्काम आटोपून परत निघतानाही गणराय ‘हलतडुलत’च जाणार आहेत.
जून-जुलैमधील मुसळधार पावसाने प्रशासन आणि शिवसेनेचे खाशीच पंचाईत केली. त्यांचे रस्त्यांबाबतच्या साऱ्याच दाव्यांवर पावसाने पाणी ओतले. या खड्डय़ांमळेु मुंबईतील वाहतुकीचे तीनतेरा वाजले. अध्र्या तासाच्या प्रवासासाठी नागरिकांना दोन-दोन तास लागू लागले. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे ऑगस्टपूर्वीच बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पालिका आयुक्त सीताराम कुंटे आणि महापौर सुनील प्रभू यांची भेट घेऊन रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यावेळी पालिका आयुक्त आणि महापौरांनी ‘बिनखड्डय़ां’च्या रस्त्यांवरूनच गणपतींचे आगमन आणि विसर्जन होईल, असे तोंड भरून आश्वासन दिले होते. त्यानुसार या द्वयींनी पालिका अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले. मात्र खड्डे भरले गेलेच नाहीत आणि रस्तेही गुळगुळीत झालेच नाहीत.
आता गणरायाला निरोप देण्याची वेळ आली तरी विसर्जन मार्गातील खड्डे बुजविले गेलेले नाहीत. भाविकांचा रोष ओढवू नये यासाठी पालिकेचे कामगार आणि कंत्राटदारांचे कर्मचारी गेले ३-४ दिवस डांबरमिश्रीत खडी टाकून खड्डे बुजविण्याचे प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यामुळे रस्ते अधिकच ओबडधोबड बनले असून विसर्जन मिरवणुकींचा मार्ग अधिक खडतर झाला आहे.
विसर्जनासाठी चौपाटय़ांवर येणाऱ्या उंच गणेशमूर्ती आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पालिकेने विसर्जनस्थळी विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मात्र विसर्जन मिरवणुकीच्या मार्गामधील खड्डय़ांकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे पालिकेच्या अपयशामुळे गणेशमूर्तीचे नुकसान होऊ नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीच विशेष काळजी घ्यावी. खड्डय़ांनी भरलेल्या रस्त्यांवरून जाताना स्टिलच्या प्लेटचा वापर करावा, असे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.