शेतात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना राजुरा तालुक्यातील वरोडा या गावात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना राजुरा पोलिसांनी आज अटक केली आहे.
राजुरा तालुक्यातील वरोडा या गावातील अवघ्या पंधरा वर्षांची मुलगी दीपक कुमार गुप्ता यांच्या शेतात कामाला होती. तिचे याच गावातील मनोज ईश्वर रंगारी या २३ वर्षीय मुलाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातूनच तिला दिवस गेले. त्यामुळे तिने मनोजच्या मागे लग्नाचा तगादा लावला. लग्न करतो, त्यापूर्वी मुलगा नको म्हणून मनोज तिला जिल्हा परिषदेच्या पाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद नारायण पोवडे यांच्याकडे घेऊन गेला. डॉ. पोवडे यांचे खासगी रुग्णालय गडचांदूर येथे आहे. त्यामुळे तिला गडचांदूरला खासगी रुग्णालयात आणण्यास डॉक्टरांनी सांगितले. खासगी रुग्णालयात आणल्यानंतर गर्भपात करण्यात आला, मात्र यानंतर मनोजने तिच्यासोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. मनोजच्या नकारानंतरही तिचा लग्नाचा तगादा कायम होता. त्यामुळे संतापलेल्या मनोजने दोन दिवसापूर्वी तिला घरी बोलावले. यावेळी घरी मनोज व त्याचे चार मित्र हजर होते. तेथेही तिने लग्नाचा आग्रह धरताच तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करण्यात आला.
यानंतर मनोज व त्याचे चार मित्र फरार झाले. प्रेमसंबंध असलेल्या मुलानेच मित्रांच्या माध्यमातून अत्याचार केल्याने संतापलेल्या पीडित मुलीने गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गडचांदूर पोलिसांनी हे प्रकरण राजुरा पोलिसांकडे सुपूर्द केले. यानंतर राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत सयाम यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली व अत्याचार करणाऱ्या मनोज रंगारी, सय्यद चाऊस हुसेन चाऊस, अमर चाऊस हुसेन चाऊस, जावेद शेख उस्मान शेख व डॉ. अरविंद नारायण पोवडे यांना अटक केली. या पाचही जणांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दिल्ली येथील सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात मुली व तरुणांमध्ये आक्रोशाची भावना असतांना या जिल्ह्य़ातही अत्याचाराची अशीच एक घटना उघडकीस आली. एका अल्पवयीन मुलीवर अशाप्रकारे अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.