दोन दशकांपूर्वी मुंबईने कुख्यात गँगस्टरांचे भर रस्त्यांवरील टोळीयुद्ध अनुभवले आहे. त्यानंतर अशी टोळीयुद्धे चित्रपटातून आपण सातत्याने पाहत आलो आहोत. अलीकडेच मुंबईत एक वेगळेच टोळीयुद्ध पहायला मिळाले. ते कुणा कुप्रसिद्ध ‘टोळीवाल्यां’चे नव्हते पण दोन टोळ्यांमधले निश्चितच होते. या टोळ्या होत्या वीज माफियांच्या. वर्चस्वाच्या लढाईतून प्रतिस्पर्धी टोळीतील म्होरक्यावर पहिला हल्ला झाला आणि त्याचा सूड म्हणून काही दिवसांत दुसरा हल्ला झाला. हल्ल्याचा कट तुरुंगात शिजला हे विशेष.
मुंबईच्या गोवंडी, शिवाजी नगर, बैंगणवाडी आदी परिसरात मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ा आणि चाळी आहेत. या ठिकाणी पूर्र्वी अनधिकृत नळजोडण्या देणारे ‘पाणीगुंड’ असत. आता या ठिकाणी बेकायदा वीजजोडणी देणारे दादा उदयास आले आहेत. अनेक छोटय़ा मोठय़ा टोळ्या या भागात वीजजोडणी देतात. मोहम्मद रईस उर्फ पप्पू कालिया आणि राजेश चौधरी या दोघांच्या टोळ्या त्यापैकी प्रमुख आहेत. या धंद्यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न दरमहिना मिळते. अर्थातच पोलिसांसह सर्व यंत्रणांचे हात ओले करूनच.
पप्पू कालियाच्या नावावर १८ गुन्हे आहेत. दोनदा त्याला मुंबईतून हद्दपारही करण्यात आले होते. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. राजेश चौधरीची देखील गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे.
राजेश चौधरी हा सध्या नाशिक तुरुंगात खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगतो आहे. तुरुंगातूनच तो वीजचोरीचे रॅकेट चालवतो. आपल्या पश्चात पप्पू कालियाचे वर्चस्व वाढत चालल्याने चौधरी संतापला होता. त्याच्या मिळकतीत वाटेकरी निर्माण झाला होता. त्याने पप्पू कालियाला मारण्याचा कट रचला. आपल्या साथीदारांना त्याने तुरुंगात भेटण्यासाठी बोलावले आणि पप्पू कालियाला मारण्याची योजना बनविली. त्यानुसार मागील शुक्रवारी चौधरीच्या साथीदारांनी पप्पू कालियावर गोळीबार केला. परंतु पप्पू त्यातून वाचला. एक गोळी त्याच्या छातीत लागली. पण शर्टाच्या खिशातील मोबाईलमुळे  तो वाचला. पण एक गोळी पायात घुसली. जखमी पप्पूवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. हा हल्ला कुणी केला हे त्याच्या लक्षात आले. परंतु त्याने मुद्दामच पोलिसांना हल्लेखोरांचे नाव सांगितले नाही. त्याला स्वत: बदला घ्यायचा होता.
जखमी कालियाने स्वत:च हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण त्याला हल्लेखोर सापडले नाहीत. त्यामुळे त्याने चिडून या टोळीतील एका सदस्याचा भाऊ मोहम्मद नईम शहा (३५) याच्यावर हल्ला केला. त्या प्रकरणात शिवाजी नगर पोलिसांनी पप्पूला अटक केली. दरम्यान, गुन्हे शाखा ६ च्या पथकाने पप्पूवर गोळीबार करणाऱ्या मोहम्मद अली आशिकअली शहा (३३), योहान उर्फ जॉन कुलाटे (२८), मोहम्मद अनिस अन्सारी (२७) या तिघांना अटक केली. या तिघांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांनी प्रत्यक्ष गोळीबार केला नसला तरी शूटर्सना मोटारसायकली पुरवणे आणि योजना बनविण्यात त्यांचा सहभाग होता. मुख्य दोन शूटर्सचा शोध पोलीस घेत आहेत.
पप्पू आणि राजेश चौधरी सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यात परस्परांबद्दल तीव्र सूडभावना आहे. पप्पू हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी शक्यता पोलिसांना वाटते आहे. तर पप्पूने वीजचोरीच्या धंद्यावर कब्जा केल्याने चौधरी संतापला आहे. त्यामुळे त्यांच्यात मोठा रक्तरंजित संघर्ष होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
ही घटना वाटते तेवढी सोपी नाही. वीजचोरीचा मोठा अनधिकृत धंदा या भागात आहे. त्यातून मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न आणि भागावर हुकूमत गाजविण्याची ईष्र्या यामुळे या टोळीदादांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही या टोळीतील सर्व सदस्यांवर लक्ष ठेवून आहोत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.