पुण्यात नव्याने बांधण्यात आलेल्या गहुंजे येथील सुब्रतो रॉय मैदानावर येत्या गुरूवारी (२० डिसेंबर) होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी ग्रामीण, शहर व महामार्ग पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मैदानात पाचशेहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार असून, मैदानातील सर्व गोष्टीवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाईल. प्रेक्षकांना मैदानात कोणतीही वस्तू घेऊन जाता येणार नाही. वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी केले आहे.
पुण्यात अनेक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत आहे. म्हाळुंगे येथील मैदानावरचा भारत-इंग्लंड यांच्यात ट्वेंटी-ट्वेंटीचा सामना होत आहे. या सामन्याच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनासंदर्भात लोहिया यांनी माहिती दिली. त्या वेळी अपर पोलीस अधीक्षक रविद्रसिंग परदेशी, सतीश मगर, शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे उपस्थित होते.
लोहिया म्हणाले की, पुणे ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस आणि शहर पोलिसांनी चोख व्यवस्था केली आहे. मैदानात व त्याच्याजवळ तब्बल पाचशेपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा राहणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून नागरिकांनी पोलिसांनी नेमून दिलेल्या रस्त्यावरून मैदानाकडे जावे. वाहन चालकांनी कोणत्याही रस्त्यावर पार्किंग करू नये. क्रिकेट सामना सुरू होण्यापूर्वी तीन तास अगोदर निघावे.
प्रेक्षकांना मैदानात जाताना कोणतीही वस्तू नेता येणार नाही. त्यांना आतमध्ये पाणी मोफत दिले जाणार असून चहा, कॉफी, शीतपेय, आइसक्रीम अशा वस्तू विकत मिळतील, त्यासाठी एकशे साठ स्टॉल ठेवण्यात आले आहेत.
मैदानामध्ये स्टँडनुसार पोलिसांची पथके ठेवण्यात आली आहेत. मैदानाच्या प्रवेशद्वारापासून ते मैदानातील प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्हीद्वारे आठ पोलिसांचे पथक नजर ठेवणार आहे. नागरिकांनी सतर्क राहून काही संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष ०२०-२५६५७१७१ वर संपर्क साधावा. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन लोहिया यांनी केले आहे.
शहराकडून मैदानाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे पांढरे यांनी सांगितले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने सातशे खासगी सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यातील दीडशे हे पार्कीगसाठी नेमण्यात आले आहेत. आतापर्यंत ८५ टक्के तिकीटविक्री झाली आहे, असे संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी सांगितले. महामार्ग पोलीस विभागाचे अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी सांगितले की, पुणे-मुंबई द्रुतगती व जुना पुणे- मुंबई महामार्गावर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.