आत्मा व कृषी विभागाच्या सहकार्याने जी गावे कृषी उत्पादन आराखडा तयार करतील त्यांना सर्व अनुदान देण्याची राज्य सरकारची तयारी आहे अशी माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीना विविध कृषी उपजीविका साधने व औजारे वितरण तसेच शेतकरी मेळाव्याचे उदघाटन विखे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य सुभाष पाटील होते. राहुरी पं. स.चे सभापती शिवाजीराव गाढे, उपसभापती दिगबंर शिरसाठ, सदस्य मंगला निमसे, मंदा डुकरे, मंदा चव्हाण तालुका कृषी अधिकारी नामदेव रोकडे आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, शेतक-यांपुढे धान्य साठवण्याचा प्रश्न असल्याने कमी भावात त्यांना धान्य विकावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन शासकीय, निमशासकीय, खासगी गोदाम कृषी विभागाच्या वतीने भाडेतत्त्वावर घ्या, जेणेकरुन शेतक-यांना बाजारभावात धान्य विकता येईल व धान्याची किंमत शेतक-यांना ठरवता येईल. केंद्र सरकारचा अधिकचा निधी निळवंडे धरणासाठी मिळणार असल्याने धरणासह कालव्यांची कामे लवकरच पूर्ण केली जातील. याचा फायदा राहुरीसह अन्य गावांनाही मिळणार आहे.
दुष्काळामुळे लोकांमध्ये परिवर्तन झाले ते स्वत:हून नद्यानाल्यातील गाळ काढत आहेत. दुष्काळी परिस्थितीत शाश्वत शेतीसाठी आपण काय करू शकतो हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी जलसंधारणाची कामे करावी लागतील. तरुणांनी शाश्वत शेतीकडे वळावे असे आवाहन विखे यांनी केले. जागतिक निविदेमुळे ठिबक सिंचनाचे भाव ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. शाश्वत उत्पादनासाठी कृषी उत्पन्न आराखडा शेतक-यांनी कृषी अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करावा. कोरडवाहू शेतक-यांचा जीवनस्तर उंचवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. कोरडवाहू शेती अभियानातून महाराष्ट्राला दिशा देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.