छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती शहर व जिल्हाभर सर्वत्र विविध कार्यक्रम, मिरवणुकांनी साजरी करण्यात आली. अखिल भारतीय वारकरी मंडळाने शहरात काढलेली दिंडी लक्षवेधी ठरली.
सकाळपासूनच विविध संघटना, मित्रमंडळाच्या वतीने दुचाकी रॅली काढून शिवछत्रपतींना अभिवादन करण्यात येत होते. छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळय़ाजवळ अखिल भारतीय वारकरी मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, महापौर प्रताप देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बाजार समितीचे उपसभापती आनंद भरोसे, स्थायी समिती सभापती विजय जामकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, उपायुक्त दीपक पुजारी आदींसह अनेक शिवप्रेमींनी पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अखिल भारतीय वारकरी मंडळाने जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविले.  दुपारी १२ वाजता जिल्हाभरातून आलेल्या भजनी मंडळाने मिरवणूक काढली. मिरवणुकीत वारकरी मंडळाचे प्रमुख बाळासाहेब मोहिते, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्राचार्य शिवाजी दळणर यांच्यासह महिला, बाल वारकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. खानापूर फाटा येथे ही मिरवणूक विसर्जित करण्यात आली. मराठा सेवा संघ, संभाजी सेना, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शहरात मिरवणूक काढण्यात आली.