जीवनधारा नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समिती पर्यावरण आणि वनीकरण तसेच ग्रीन होप यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवारपासून वृक्षारोपण मोहिमेचा शुंभारभ करण्यात आला आहे. शुक्रवारी ऐरोली सेक्टर १५ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या लगत व एनआरआय कॉम्प्लेक्स सेक्टर ५४ नेरुळ येथे वृक्षारोपण मोहिमेचा शुभांरभ करण्यात आला. या वेळी पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या वेळी आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के आदी उपस्थित होते.  झांडाचे केवळ रोपण करून ग्रीप होम आपले कार्य संपवणार नाही तर झाडे जगविण्यासाठी नियोबनबद्ध कार्यक्रम राबविणार आहे. ग्रीन होपच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, कारखाने, डोंगर सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून सदर ठिकाणी आवश्यक असणारी झाडे लावली जाणार आहेत. डोंगरावर मातीची धूप थांबविणारी तर रस्ते, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी सावली देणारी शोभेची झाडे लावली जाणार आहेत. खाडीकिनारी सागरी जीवसृष्टीसाठी संजीवनी ठरणाऱ्या आणि पुरापासून परिसराचे संरक्षण करणाऱ्या खारफुटीच्या झाडांचे रोपण करण्यात येते. नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रातही वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात येणार असून प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काजू, रेन-ट्री, जांभूळ, बोर, चिंच, फणस, पेरू, फिकस, शंकासूर, बदाम, अशोका, पाम आदी जातींचे वृक्ष लावण्यात येत आहे.  
ग्रीन होपच्या वतीने वृक्षरोपे वाटप केंद्रातून नागरिकांना मोफत रोपटय़ांचे वाटप केले जाणार आहे. नागरिकांनी मोफत वृक्षरोपांसाठी ७७१८८८१६२६ किंवा ९९८७३३८७०२ यांवर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रीन होप संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.