बी. आर. चोप्रानिर्मित व दिग्दर्शित ‘गुमराह’ काळाच्या खूप पुढचा सिनेमा ठरला. १९६२ च्या या सिनेमाचे हे ५०वे वर्ष आहे.. ५० वर्षांपूर्वीची एकूणच सामाजिक- सांस्कृतिक परिस्थिती पाहता ‘गुमराह’सारखे वेगळे व धाडसी कथानक सुचणे व त्या काळातील सरळमार्ग- कौटुंबिक सभ्यतेला प्राधान्य देणाऱ्या प्रेक्षकांना ते आपलेसे वाटणे आणि कथेच्या ‘नायिके’बद्दलची सहानुभूती कायम राहणे हा समतोल साध्य झाला हे या चित्रपटाचे सर्वात मोठे यश आहे. कितीही वेळा हा चित्रपट पाहिल्याने त्यातील नाटय़ाबद्दलची उत्सुकता अजिबात कमी होत नाही आणि आजच्या ई-कॉमर्स पिढी, शहरी मोकळे वातावरण यांनी ‘होम थिएटर’मध्ये हा चित्रपट पाहिल्यास त्यांनाही तो ‘आजचा’च वाटेल असा त्याचा दर्जा आहे.
दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांची १९५१च्या ‘अफसाना’पासून सुरू झालेली कारकीर्द ‘शोले’ (१९५३), ‘एक ही रास्ता’ (१९५६, या वेळी त्यांनी बी.आर. फिल्म्स ही आपली निर्मिती संस्था स्थापन केली.), ‘नया दौर’ (१९५७), ‘साधना’ (१९५८), ‘कानून’ (१९६०), या चित्रपटांमुळे पुढे जाताना त्यांची ‘सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण असणारे’ अशी प्रतिमा निर्माण झाली. दरम्यान, त्यांच्याच निर्मिती संस्थेच्या ‘धूल का फूल’ (१९५८) व ‘धर्मपुत्र’ (१९६१) या यश चोप्रा दिग्दर्शित चित्रपटांनी बी. आर. चोप्रा यांची तीच प्रतिमा अधिक बळकट झाली आणि त्याच टप्प्यावर ‘गुमराह’ आला व त्याच्या कथा- कल्पनेने तात्कालिक समीक्षक व प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला.
‘गुमराह’चे थोडक्यात कथानक असे- राजेंद्र (सुनील दत्त) व मीना (माला सिन्हा) यांचे नैनितालच्या हसीन वादीयों में प्रेम खुलले-फुलले असतानाच मीनाची बहीण कमला (निरुपा रॉय) हिचे दुर्दैवी अपघाती निधन होते. म्हणून तिच्या लहान मुलाच्या पालन-पोषणाची जबाबदारी घेण्यासाठी मीनाला कमलाचा पती अशोक (दादामुनी अशोककुमार) याच्याशी लग्न करावे लागते. मीनासाठी हा प्रचंड मोठा भावनिक धक्का असतो. या नात्यासाठी अगदी नाइलाजाने तिचे मन तयार होते. लग्नानंतर अशोक-मीना मुंबईत राहायला येतात व राजेंद्रचीही आता मुंबईतच गायकाची कारकीर्द सुरू होते. आपली प्रेयसी दुरावल्याने तो विलक्षण दु:खी असतो, तर तो दुरावल्याने मीना सतत कासावीस असते. अशोक आपल्या कामात बिझी असतानाच राजेंद्र व मीनाची भेट होते. आपला प्रियकर पुन्हा भेटतोय म्हणून ती आनंदते, पण आता आपण विवाहिता आहोत या जबाबदारीचीही जाणीव तिला होते. अशा मानसिक द्वंदात ती सापडली असतानाच प्रियकराला ती चोरून भेटते, या कारणास्तव लैला (शशिकला) मीनाला ब्लॅकमेल करू लागते. लैलाच्या दहशतीने मीना सतत भीतीच्या सावटाखाली राहते, तिला प्रियकराचा आधार तर हवा आहे, पण पतीसोबतही राहायचे आहे. एका वेगळ्या टप्प्यावर कथा येऊन पोहोचते. लैला हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून करते हे ‘गुमराह’ पाहणाऱ्यांना माहीत असले तरी आजच्या पिढीची उत्सुकता कायम राहण्यासाठी ते रहस्यच राहू देत.
मीनाला अशोकशी विवाह करावा लागतो या क्षणापासून चित्रपटात पुढे काय होणार, याबाबतची आपली उत्सुकता वाढते व लीलाच्या आगमनानंतर ती एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचते. ५० वर्षांपूर्वी एक विवाहिता पतीशी एकरूप होण्याऐवजी तिचे मन माजी प्रियकराकडे धावते, असे पारंपरिक लोकप्रिय चित्रपटांतून साकारणे केवढे तरी धाडसाचे होते. अशी भूमिका साकारल्याने त्या काळात ‘नायिकेच्या प्रतिमा व लोकप्रियता’ यांना धक्का बसण्याची शक्यता होती. (चित्रपटात साकारलेली भूमिका म्हणजेच त्या कलाकाराची प्रत्यक्षातील ओळख असे मानणारा तो काळ होता.) माला सिन्हाने ते आव्हान पेलले याचे कौतुक हवे. बी. आर. चोप्रा यांनी कथानक हाताळताना ही प्रेयसी पतीचा विसर पडू देत पूर्वीच्या प्रियकरासोबत भेटीगाठीचा आनंद घेते, असा सवंगपण येऊ दिला नाही. मीना लग्नापासून लैलाच्या धमकीपर्यंत सतत विचित्र कोंडीत पडते व प्रेक्षक तिला सहानुभूती दाखवतात हे साध्य होऊ शकले हे या चित्रपटाचे मोठे यश आहे. एका वादळी विषयाची परिपक्व हाताळणी असे ‘गुमराह’बाबत म्हणावे लागेल. विशेषत: त्या काळात नायक- नायिका- खलनायक अशा चौकटीत अडकलेल्या हिंदी चित्रपट व त्याच्या प्रेक्षकांना ‘गुमराह’ मोठाच सांस्कृतिक धक्का ठरला. चोप्रा यांनी त्या काळात सहज खपून गेला असता असा कोणताही ‘इमोशनल अत्याचार’ न करता हे कथानक हाताळले. ‘गुमराह’नंतर ‘हमराज’, ‘दास्तान’, ‘इन्साफ का तराजू’, ‘निकाह’ वगैरे बरेच चित्रपट व ‘महाभारत’सारखी भव्य मालिका त्यांनी दिग्दर्शित केली, पण त्यांच्या एकूण वाटचालीत ‘गुमराह’ वेगळा, वादग्रस्त व अस्वस्थ करायला लावणारा! विशेषत: ५० वर्षांपूर्वीचा आपला हिंदी चित्रपट, त्याची चौकट पसंत असणारा प्रेक्षक व एकूणच कौटुंबिक- वैवाहिक- सामाजिक परिस्थिती पाहता तर ‘गुमराह’ साकारणे व तो सगळ्यांच्या पचनी पडणे हे विशेष उल्लेखनीय.
साहीरची काव्यगीते व रवीचे संगीत यांनी या वेगळ्या विषयात भरच टाकली. तुझको मेरा प्यार पुकारे (पाश्र्वगायक महेंद्र कपूर- आशा भोसले) आप आये तो (महेंद्र कपूर), चलो एक बार फिरसे (महेंद्र कपूर), आ भी जा (महेंद्र कपूर), एक परदेसी दूर से आया (आशा भोसले), आ जा आजा रे (आशा भोसले) इत्यादी गाणी ‘आजची वाटावीत’ अशी श्रवणीय, अर्थपूर्ण व पटकथेला पुढे नेणारी अशी.
‘गुमराह’च्या दोन थेट ‘रिमेक’ आल्या. १९७० साली मल्याळम भाषेत ‘विवाहिता’ चित्रपट आला. पद्मिनी, प्रेम नझीर व सत्येन यांच्या त्यात भूमिका होत्या. कालांतराने २००७ साली धर्मेश दर्शन हिंदीत ‘बेवफा’ घेऊन आला तेव्हा त्याला मूळ ‘गुमराह’चा आत्मा व गुंता कशात आहे हेच समजले नसल्याचे जाणवले. त्यात करिना कपूरला विचित्र पेचात सापडलेली नायिका दाखवताना त्याने तिचे रूपडे (भूमिकेचे बाह्य़ांग) महत्त्वाचे मानले. एकदा ती संपूर्ण पाठ उघडी असणारे वस्त्र परिधान करते या दृश्याची चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीत प्रचंड टामटूम केली तेव्हाच तो या विषयाकडे सवंगतेने पाहतो हे स्पष्ट झाले (एखादा दिग्दर्शक असाही दिसतो म्हटलं.) करिनानेही भूमिका व विषय समजून वगैरे न घेता आंघोळीचा दीर्घ प्रसंग, टॉवेल सुंदरी वगैरेत विशेष रंग भरला (जे दिसले तेच सांगतोय) हा दोन पिढय़ांच्या अभिनेत्रीचा आपल्या भूमिका- व्यक्तिरेखा याकडे पाहण्याचा भिन्न दृष्टिकोन झाला. चोप्रा यांना या विषय व स्त्रीत जे सापडले ते दर्शनला जाणवलेही नाही. (म्हणूनच काही क्लासिक चित्रपटांचे रिमेक होऊच नयेत. कशाला हो त्या मूळ चित्रपटावर अन्याय करता.) यश चोप्रा यांचा ‘सिलसिला’ अमिताभ- जया-रेखा यांच्या प्रत्यक्षातील प्रेम त्रिकोणावर असल्याची आजही खमंग चर्चा होत असली तरी त्याचा पूर्वार्ध बराचसा ‘गुमराह’सारखाच आहे. शशी कपूरचे अपघाती निधन होते म्हणून त्याच्या भावाला (अमिताभ) त्याच्या पत्नीशी (जया) लग्न करावे लागते म्हणून तो आपल्या प्रेयसीपासून (रेखा) दुरावतो- दुखावतो. ही प्रेयसी लग्न करते, पण तिचे मन पतीपेक्षा (संजीवकुमार) आपल्या माजी प्रेयसीकडे धावते. या कथासूत्रात ‘गुमराह’ दिसतो ना..
५० वर्षांनंतरही ‘गुमराह’चे कथानक व त्याचा प्रभाव अत्यंत प्रभावी ठरण्याचे एक कारण म्हणजे,  आपल्या परंपरा, मूल्ये, सभ्यता, संस्कृतीवरही समाजाला प्रियकरापेक्षा पतीशी एकनिष्ठ राहिलेली गायिका आजही आवडते. ‘गुमराह’ची नायिका अखेरीस पतीकडे येते हे तेव्हा जेवढे प्रभावी ठरले, तेवढेच आजही सुखावणारे आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ची नंदिनी (ऐश्वर्या रॉय) प्रियकराऐवजी (सलमान खान) पतीचाच (अजय देवगन) हात धरते हे जास्त प्रभावी ठरले. सिनेमा व समाज दोन्हींत वेगाने बदल होताना पतीला नाकारून वा सोडून प्रियकराला आपलंसं मानणारी स्त्री ‘बंडखोर नायिका’ म्हणून ओळखली जाईल, वगैरे गोष्टींचे समर्थन करणारा एक वर्ग समाजात वाढतोय. त्यांना ‘गुमराह’ची पुनर्निर्मिती करताना नायिका नाइलाजाने विवाहित होते, पण प्रियकरासोबत सर्व सुखे अनुभवते व तिचे तेच वागणे समर्थनीय आहे, असे वाटेल. हीच ‘विवाहबाह्य़ संबंधांना महत्त्व देणारी नायिका’ अखेरीला पतीला सोडचिठ्ठी देते, असा त्यांच्या गोष्टीचा शेवट असेल. समाजात असे काही घडते असा दावा ते करतील. ‘मर्डर’ची नायिका (मल्लिका शेरावत) पतीला (अश्मित पटेल) आपल्या कामातून वेळ मिळत नाही, अशा परिस्थितीत भेटलेल्या माजी प्रियकरासोबत (इम्रान हाश्मी) ती प्रचंड मौजमजा करतानाच त्याच्या साथीने पतीचा खून करायचे ठरविते.. अवघ्या एका दशकातच ‘मर्डर’चा प्रभाव ओसरला, पण पाच दशकांनंतरही ‘गुमराह’ शिळा झालेला नाही, याच्या नायिकेचा आजही पाय घसरू नये असे वाटते, यातच आपल्या समाजाच्या परंपरावादी भावनेचे प्रतिबिंब दिसते. (विषय वादाचा होऊ शकतो.)
पूर्वीचा रसिक प्रत्येक वेळी ‘या सिनेमापासून घेण्यासारखे काही आहे काय’ असा प्रश्न नेहमी करे व त्याचे त्याला उत्तरही सापडे. ‘गुमराह’च्या वेळीही त्याला ते सापडले व ते आजच्या प्रगत काळातही लागू पडते, यातच हा चित्रपट जिंकतो.. एकदा लग्न झाल्यावर प्रियकराला विसरावे व पतीशी एकनिष्ठ राहावे (पतीच प्रियकर असेल तर उत्तमच!) अन्यथा संसाराकडे दुर्लक्ष होऊन मन ‘बाहेर’ धाव घेत राहिले तर कुठे व कसे ‘गुमराह’ होऊ हे सांगणे अवघड आहे.. (हा नियम पतीलाही लागू पडतो.) कालचा ‘गुमराह’ आज काही गोष्टींचा विचार करायला लावतोय हे सर्वश्रेष्ठ कलाकृतीचे लक्षण आहे.