एचएएल कारखान्यात लढाऊ विमान बांधणीच्या तांत्रिक स्वरुपातील कामावर कंत्राटी कामगार नेमण्यास कामगार संघटनेच्या विरोधाचे पडसाद मंगळवारी उमटले. या मुद्यावरून सकाळी एचएएलच्या प्रवेशद्वारावर संबंधित कंत्राटी कामगारांचा कंत्राटदार आणि कामगार संघटनेचा पदाधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. या निषेधार्थ कामगार संघटनेने द्वारसभा घेत या स्वरुपाच्या नियुक्तीला विरोध दर्शविला. दुसरीकडे एचएएलच्या जनसंपर्क विभागाने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे म्हटले आहे.

या घडामोडींची माहिती एचएएल कामगार संघटनेचे अध्यक्ष भानुदान शेळके यांनी दिली. काही दिवसांपूर्वी एचएएल व्यवस्थापनाने चार वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपात कामगार नेमण्याचे परिपत्रक काढले आहे. महत्वपूर्ण कामावर कंत्राटी कामगार नेमल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याची जाणीव करून देत कामगार संघटनेने या स्वरुपाच्या नेमणुकीस विरोध दर्शवत कायमस्वरुपी कामगार नेमण्याची मागणी केली आहे. या घडामोडी घडत असताना सुमारे १०० कामगार तांत्रिक स्वरुपाच्या कामासाठी नेमल्याचे संघटनेच्या लक्षात आले. या कामगारांना विरोध दर्शविण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी प्रवेशद्वारावर थांबले होते. कंत्राटी कामगारांना आतमध्ये घेण्यास त्यांचा विरोध होता. यावेळी कंत्राटदार आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. या घटनेची माहिती समजल्यानंतर कामगार प्रवेशद्वारात जमा होऊ लागले. या स्वरुपाच्या निर्णयाला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात कामगारांनी घोषणाबाजी केल्याचे सांगितले जाते.
एचएएल कारखान्यात आधीपासून बगीचा देखभाल, उपहारगृह व स्वच्छता तत्सम कामांसाठी कंत्राटी कामगार नेमले जात आहेत. अकुशल कामांसाठी संबंधितांची नेमणूक करण्यास संघटनेचा विरोध नाही. नियमित स्वरुपाचे अर्थात तांत्रिक स्वरुपाच्या कामात कंत्राटी स्वरुपात कामगार नेमू नये, अशी संघटनेची भूमिका आहे. तांत्रिक स्वरुपाच्या कामासाठी कायमस्वरुपी पात्र उमेदवारांची नियुक्ती करावी, कंत्राटी स्वरुपात ही कामे कामगारांना दिली गेल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो याकडे निवेदनाद्वारे व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यात आल्याचे शेळके यांनी सांगितले. लढाऊ विमानाशी संबंधित तांत्रिक काम कुशल कामगारांकडून होणे आवश्यक आहे. चार वर्षांसाठी कंत्राटी स्वरुपात कामगार नेमण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. तथापि, ही बाब गंभीर असल्याने त्यास कायमस्वरुपी कामगारांचा विरोध असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. दरम्यान, एचएएलच्या नाशिक कारखान्यात सध्या सुखोई या लढाऊ विमानांची बांधणी प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत जवळपास १५० सुखोई विमानांची बांधणी करून ती हवाई दलाच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. पुढील काळात एचएएलला आणखी ७० ते ८० सुखोई विमानांची बांधणी करावयाची आहे. विमानाच्या बांधणीचे वेगवेगळ्या विभागात चालणाऱ्या कामांवर कंत्राटी कामगार नेमण्यास कामगार संघटनेचा विरोध आहे.या घडामोडींबाबत एचएएलच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. कंत्राटदार आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यात काही वाद झाला नाही तसेच त्यानंतर कोणतीही द्वारसभा झाली नसल्याचे जनसंपर्क विभागाने म्हटले आहे.