ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या जंगलात मोकाट कुत्रे सोडल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी आरोग्य निरीक्षक प्रदीप मडावी यांना निलंबनाची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चंद्रपूर वन विभागाने मनपा आयुक्तांना नोटीस बजावल्यानंतर मनेका गांधी यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. त्याचाच परिणाम आयुक्तांनी गुरुवारी सायंकाळी संबंधित ठिकाणाची पाहणी केली असता वन्यप्राण्यांनी कुत्र्याच्या शरिराचे लचके तोडल्याचे दिसून आले.
शहरातील मोकाट कुत्रे महापालिकेच्या गळ्यात अडकलेले हाड बनले आहे. मोकाट कुत्र्यांचा त्रास बघता महापौर संगीता अमृतकर यांनी आयुक्तांना कुत्रे पकडण्याची मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. महापौरांच्या आदेशाचे पालन करतांना आयुक्तांनी कुत्रे पकडण्याची मोहिम राबविण्यास सुरुवात केली. मात्र, कुत्रे लोहारा व घंटा चौकीच्या जंगलात सोडण्यात आल्याने ग्रीन प्लॅनेट सोसायटीने चंद्रपूर वन विभागाने याची तक्रार केली. चंद्रपूर वन विभागाचे विभागीय वन अधिकारी एन.डी.चौधरी यांनी मनपा आयुक्त प्रकाश बोखड यांना नोटीस बजावली. वनखात्याच्या या नोटीसला आयुक्तांनी उत्तर देतांना बायपास मार्गावरील कुत्ता घरात कुत्रे सोडण्यात येत असल्याचे कळविले, परंतु ग्रीन प्लॅनेटच्या सदस्यांनी जंगलात वन्यप्राण्यांनी कुत्र्याच्या शरिराचे लचके तोडल्याचे छायाचित्रच आयुक्तांना दाखविले. चंद्रपूर-मूल मार्गावर मामला ते वन विभागाच्या डेपोच्या मधल्या जंगलात कक्ष क्रमांक ३९४ मध्ये वन्यप्राण्यांनी कुत्र्याची शिकार केल्यानंतर शरीर व मासाचे तुकडे मोठय़ा संख्येने तेथे पडलेले आहेत. वन्यप्राणी मास जंगलात घेऊन गेले आणि वाघ, बिबटय़ाला या जीवघेण्या विषाणूची लागण होण्याची शक्यता सुध्दा ग्रीन प्लॅनेटचे प्रा.योगेश दुधपचारे यांनी लोकसत्ताजवळ बोलून दाखविली.
दरम्यान, हे प्रकरण खासदार मनेका गांधी यांनी सुध्दा अतिशय गांभीर्याने घेतले आहे. त्यांनी यासंदर्भात मनपा आयुक्तांना कडक पत्र लिहिल्याची माहिती आहे. मनेका गांधी यांचे पत्र मिळताच आयुक्त प्रकाश बोखड यांनी गुरुवारी सायंकाळी प्रा.योगेश दुधपचारे व प्रा. सचिन वझलवार यांना बोलावून घेतले व वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी प्रा.दुधपचारे व प्रा.वझलवार यांनी आयुक्तांना जंगलातील कुत्र्याच्या मासाचे छायाचित्र सुध्दा दाखविले. त्यानंतर आयुक्त बोखड व ग्रीन प्लॅनेटच्या सदस्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथेही त्यांना कुत्र्याच्या मासाचे तुकडे मिळाले. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली. शहरात मोकाट कुत्रे पकडल्यानंतर ते जंगलात सोडण्याचे काम कुत्तागाडीचे कर्मचारी करायचे. याचे प्रमुख म्हणून स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी काम बघतात. प्रकरण गंभीर झाल्याचे बघून आता आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी यांना निलंबनाची नोटीस बजावली आहे.