उरण तालुका व शहर परिसरात सोमवारपासून वादळीवाऱ्यांसह पाऊस सुरू असून मंगळवारी शहरातील मोरा भवरा रस्त्यावर झाड कोसळल्याने काही तास वाहतूक कोंडी झाली होती. या वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत.
उरण तालुक्यात दोन दिवसांपासून वादळीवाऱ्यांसह जोरदार पाऊस पडत आहे. यामध्ये पाऊस कमी तर वारे जास्त आहेत. मात्र वाऱ्याच्या वेगामुळे उरण शहर तसेच जेएनपीटी कामगार वसाहत येथील झाडे उन्मळून पडली आहेत. मंगळवारी मोरा-भवरा रस्त्यावर सकाळी आठ वाजता पडलेले एक झाड काढण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. हे झाड कापून काढून ते रस्त्यातून दूर करावे लागले. दरम्यानच्या काळात येथे काही तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्याचा त्रास वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागला. तालुक्यातील पूर्व विभागात वादळीवाऱ्यांमुळे काही घरांची कौलेही उडाल्याची घटना घडली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या वादळीवारे व पावसामुळे अनेक ठिकाणी वीजही गायब झाली होती तर उरण शहरातीलच महावितरणच्या एका स्विच बॉक्सला आग लागल्याचीही घटना घडली.