नाशिकमध्ये शास्त्रीय संगीतासाठी पोषक वातावरण असून येथील कलावंतामध्ये मेहनत घ्यायची तयारी आहे. चिकाटीने हरकती, चीज राग समजून घेतात.. असे गौरवोद्गार पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य तसेच चिन्मय नादबिंदू संस्थेचे संगीत संचालक हिमांशू नंदा यांनी काढले. निमित्त होते, चिन्मय स्वरांजलीच्यावतीने आयोजित कार्यशाळेचे. या कार्यशाळेच्या समारोप निमित्त मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता कृतकोटी शंकराचार्य संकुलात नंदा यांचा बासरी वादनाचा कार्यक्रम होणार आहे.
चिन्मय स्वरांजलीच्यावतीने नंदा यांच्या मार्गदर्शनाने राज्यस्तरीय बासरी वादन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचा समारोप मंगळवारी होणार आहे. या निमित्त त्यांनी संवाद साधला. बासरी हे कृष्णाच्या अत्यंत जवळचे वाद्य आहे. नैसर्गिक वाद्य अशी त्याची ओळख असली तरी त्याच्या हरकती, त्याची शास्त्रीय संगीतातील व्याप्ती यापासून सर्वसामान्य माणूस तसा अपरिचित असतो. नाशिकसह अन्य जिल्ह्यातील ५० हून अधिक बासरीवादकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला. तीन दिवसीय कार्यशाळेत मुलांमध्ये बासरी शिकण्याची असणारी ओढ प्रकर्षांने जाणवली असे त्यांनी सांगितले. दिवसाला आठ ते दहा तास कलावंतानी रियाझ करत हरकती शिकण्यावर भर दिला. कार्यशाळेत विविध रागाची मांडणी करत असतांना राग यमनवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्याचे सादरीकरण, श्वास नियंत्रकाची तंत्रे, तिहाई, गमक, मुर्की या बासरी वादनाच्या विविध बारकाव्यांचे तंत्रशुध्द मार्गदर्शन करण्यात आले. मंगळवारी कार्यशाळेचा समारोप होणार असून नंदा यावेळी बासरीवादन करणार आहेत. नाशिककरांनी या मैफलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.