इतिहास हा विषय प्रेरक आणि क्रांती घडविणारा असल्याने समाजासाठी जिव्हाळ्याचा व महत्वाचा ठरतो. त्यामुळे केवळ परीक्षेत गुण मिळविण्यासाठी नव्हे तर, संस्कार घडविणारा विषय म्हणून याची मांडणी झाल्यास समाज मनाला प्रेरणा मिळणारा हा विषय होईल, अशी अपेक्षा इतिहास संशोधक आणि आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केली.
येथील भुसावळ कला, विज्ञान आणि नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात आयोजित अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या २१ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरद हेंबाळकर होते. डॉ. जयसिंग पवार, परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव झांबरे, सचिव मधुकर जाधव, डॉ. बी. डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी आ. चौधरी यांनी इतिहास हा वस्तुनिष्ठ आणि प्रेरक असला पाहिजे, असे मत मांडले. तसेच तो क्रांती घडविणाराही असला पाहिजे. समाजहितासाठी तशी त्याची मांडणी होणे आवश्यक आहे. अशा विषयाची मांडणी करताना या देशाचा अभिमान प्रत्येकाला वाटला पाहिजे, अशी अपेक्षा आमदार चौधरी यांनी व्यक्त केली. चिकित्सा, जिज्ञासा आणि विकास अशी विषयाची मांडणी झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांत विषयाचा आत्माभिमान जागृत होतो. त्याचे उदाहरण म्हणजे इस्त्रायल हा देश होय.
उत्तम विचार व संस्कार इतिहासाच्या शिक्षणांमुळेच मिळतात. शिक्षणामुळेच जीवनात अमूलाग्र बदल होत असल्याने जीवनात इतिहासाचे शिक्षण महत्वपूर्ण ठरते, असेही ते म्हणाले. प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांनी प्रास्तविक केले. प्रा. कमल पाटील व प्रा. रेखा गाजरे यांनी सूत्रसंचालन केले.
परिषदेमध्ये सुमारे १७० शोधनिबंधांचे वाचन करण्यात आले. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन विभागात शोधनिबंधांचे वाचन करण्यात आले. या तीन्ही सत्रांच्या अध्यक्षस्थानी अनुक्रमे डॉ. बिंदा परांजपे, डॉ. रमजान शेख, डॉ. नीता खांडपेकर होते.