शहरातील मार्जिनल स्पेस व टेरेसचा अगोदरच ताबा घेऊन हातपाय पसरणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांनी आता रीतसर आजूबाजूची मोकळी जागा पालिकेकडे मागितली आहे. त्यासाठी त्यांनी नुकतीच आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे देखील या बैठकीला उपस्थित होत्या. पालिकेने ही जागा भाडेतत्त्वावर या व्यावसायिकांना दिल्यास पालिकेच्या तिजोरीत काही रक्कम जमा होईल असे गाजरदेखील आयुक्तांना दाखविण्यात आले आहे.
नवी मुंबईत सुमारे दीडशे हॉटेल व्यावसायिक आहेत. यातील अनेक व्यावसायिकांनी हॉटेलच्या मागील पुढील मोकळ्या जागेचा फायदा घेतला आहे. काही जणांनी टेरेस सामावून घेताना तेथे बैठक व्यवस्था तयार केली आहे. वाशी येथील अनेक हॉटेलमध्ये अशा प्रकारे हडप केलेल्या मोकळ्या जागेत मद्यशाळा भरत असल्याचे दिसून येतात. प्रभाग अधिकाऱ्याच्या कृपेने गिळंकृत करण्यात आलेल्या या जागेसाठी लाखो रुपयांचा नैवेद्य या अधिकाऱ्यांना मिळत आहे. या अधिकाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून कंटाळलेल्या व्यावसायिकांनी पालिकेकडे मोकळ्या जागांची अधिकृत मागणी केली आहे. या निमित्ताने पालिकेला महसूल मिळेल, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. पालिकेने अशी परवानगी दिली म्हणजे पावसाळ्यापुरते मर्यादित असलेले पावसाळी शेड कायमस्वरूपी शेडची जागा घेण्यास मोकळे होणार आहेत. त्यानंतर ही जागा आपलीच असल्याच्या तोऱ्यात हे हॉटेल व्यावसायिक वावरणार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन या मागणीकडे कशा प्रकारे लक्ष देत आहे हे पाहिले जात आहे.