आवास अधिकार हाच मानव अधिकार असल्याचा सूर ग्रामीण झोपडपट्टी जनसंमेलनातून व्यक्त झाला. विदर्भ असंघटित श्रमिक पंचायत व ग्रामीण विकास आघाडीच्या वतीने  इसासनी भीमनगरातील बोधीमग्गो महाविहारात नुकतेच हे जनसंमेलन पार पडले.
अध्यक्षस्थानी मारोतराव डहाट होते.  प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अनिल वासनिक, विदर्भ असंघटित श्रमिक पंचायतचे महासचिव रूपचंद्र गद्रे, शहर विकास मंचचे संयोजक रामलाल सोमकुंवर, स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष राजकुमार वंजारी, नागपूर ग्रामीण विकास आघाडीचे संयोजक युवराज फुलझेले, अंगणवाडी कर्मचारी सभेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर शुक्ला, शैलेंद्र वासनिक, संतोष जयस्वाल, सुबोध डहाट, राजू शाहू उपस्थित होते.
डोक्यावर पुरेसे छप्पर आणि पुरेशा सामाजिक सेवांचा लाभ होणे हा मूलभूत मानवी हक्क आहे. सन्मानाने जीवन जगायचे असेल तर उपजीविकेचे योग्य साधन, शिक्षण, निवारा, आरोग्य व अन्य सोयी-सवलती नागरिकांना प्राप्त झाल्याशिवाय न्याय मिळणार नसल्याचे अनिल वासनिक म्हणाले.
 यावेळी असंघटित श्रमिकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. गरीब, कष्टकरी लोकांनी पडिक जमिनीवर कच्ची घरे बांधून आपल्या निवाऱ्याची सोय केली आहे. त्यांच्या नावे घराच्या जमिनीचे मालकी पट्टे देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे मत रामलाल सोमकुंवर यांनी व्यक्त केले. राजकुमार वंजारी, रूपचंद्र गद्रे, चंद्रशेखर शुक्ला, युवराज फुलझेले यांची यावेळी भाषणे झाली. आभार सुबोध डहाट यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील झोपडपट्टीवासीय महिला-पुरुष उपस्थित होते.