पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्या महिलेबरोबर विवाह करून  तिच्याकडून पहिल्या पत्नीचा वाद मिटविण्यासाठी ८० हजारांची मागणी करून तिचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपातून पती व सासूची सोलापूरच्या सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दुसऱ्या पत्नीच्या छळाबद्दल कलम ४९८ अ लागू होत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.
बार्शी तालुक्यातील भालगाव येथील चंद्रकांत गोपीनाथ कराड (वय ३०) याने पहिली पत्नी हयात असताना भाग्यशाला बगवान घोळवे (वय २०) हिच्याबरोबर दुसरा विवाह केला होता. परंतु त्यामुळे पहिली पत्नी नाराज झाल्याने न्यायालयात वाद सुरू झाला. हा वाद मिटविण्यासाठी भाग्यशाला हिने माहेरातून ८० हजारांची रक्कम घेऊन यावी म्हणून पती चंद्रकांत व सासू अयोध्या (वय ६७) यांनी तिचा छळ सुरू केला. त्यामुळे वैतागून भाग्यशाला हिने स्वत: पेटवून घेऊन आत्महत्या केली, असा सरकार पक्षाचा आरोप होता. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. मराठे यांच्यासमोर झाली.
आरोपीचे पहिले लग्न झाले असताना त्याने दुसरे लग्न भाग्यशाला हिच्याशी केल्याने हे दुसरे लग्न कायद्याने वैध ठरत नाही. त्यामुळे भाग्यशाला हिला पत्नी किंवा आरोपीला तिचा पती किंवा नातेवाईक या व्याख्येमध्ये बसविता येणार नाही व या कारणाने महिलेच्या छळाबद्दल तिचे पती किंवा नातेवाईकांना शिक्षेस पात्र करणारे भारतीय दंड विधान कलम ४९८ (अ) लागू करता येणार नाही, असा युक्तिवाद आरोपींचा बचाव करताना अॅड. मिलिंद थोबडे यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य़ मानून न्यायालयाने निकाल दिला. अॅड. थोबडे यांना अॅड. विनोद सूर्यवंशी, अॅड. राजकुमार मात्रे, अॅड. अभिजित इटकर यांनी साह्य़ केले, तर सरकारतर्फे अॅड. डी. के. लांडे यांनी काम पाहिले.