मांढरदेव यात्रेत पशुबळीस यापूर्वीच बंदी घातलेली असून यंदा होणा-या यात्रेत या बंदीचे उल्लंघन केल्यास नव्या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा अपर जिल्हाधिकारी डी. एस. प-हाड यांनी दिला आहे.
मांढरदेव येथील काळूबाईची यात्रा यंदा १५ ते १७ जानेवारी दरम्यान होत आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी येथील पंचायत समिती कार्यालयात सातारा व भोर येथील प्रशासन व पोलीस अधिका-यांची बैठक प-हाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी वाईचे प्रांताधिकारी सूरज वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर धस, तहसीलदार सुनील चंदनशिवे, भोरचे तहसीलदार राम चौबे, गटविकास अधिकारी दीपा बापट, पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, दारूबंदी उत्पादन खात्याचे येळे आदी अनेक खात्यांचे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते.
या वेळी प-हाड म्हणाले की, मांढरदेव यात्राकाळात मोठ्या प्रमाणात पशुबळीच्या घटना घडतात. देवाच्या नावाखाली अशा पशुबळीवर यापूर्वीच बंदी घालण्यात आलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रशासन याबाबत खबरदारीच्या उपाययोजनांचीही अंमलबजावणी करत आहे. यंदाच्या वर्षीपासून याबाबत नव्या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार करण्यात येईल. देवाच्या नावाखाली कुठल्याही पशुपक्ष्याच्या हत्येस या कायद्यानुसार बंदी घालण्यात आलेली आहे. या जोडीनेच अंधश्रद्धा निर्माण होईल असे कुठल्याही कृत्यावर बंदी असून असे कृत्य घडल्यास कारवाई करण्याचा इशाराही पऱ्हाड यांनी दिला.
दरम्यान, या यात्रेमध्ये पूर्वी घडलेल्या अपघाताच्या पार्श्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने सर्व विभागास योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये भाविकांच्या गर्दीचेही नियोजन करण्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या यात्रेसाठी सातारा, पुणे जिल्हयासह राज्यातील अनेक भागांतून भाविक येतात. वाहनांच्या व्यवस्थेमुळे खासगी वाहनांची संख्या वाढते आहे. मंदिर परिसराची भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन याबाबत वाहतुकीबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्तेदुरुस्ती, वाहनतळाबाबत ग्रामस्थ, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ, पोलीस आदी सर्व विभागांना या वेळी आदेश देण्यात आले आहेत.
एस.टी.ची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा, पाणी, स्वच्छतागृह आदी बाबतही या वेळी संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या. वाईचे प्रांताधिकारी सूरज वाघमारे हे यंदाच्या यात्रा नियोजनाचे प्रमुख आहेत. तहसीलदार सुनील चंदनशिवे यांनी आभार मानले.