पुणे विद्यापीठाच्या नगर येथील प्रस्तावीत उपकेंद्राचे काम येत्या वर्षभरात बरेचसे मार्गी लागेल अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. या उपकेंद्रला अद्यापि राज्य सरकारची मंजुरी नाही हे त्यांनी मान्य केले, मात्र नजिकच्याच काळात ही प्रक्रिया पुर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
नगर उपकेंद्राच्या स्थानिक सल्लागार समितीची बैठक आज येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीआधी डॉ. गाडे यांनी पत्रकारांना वरीलप्रमाणे माहिती दिली. तत्पुर्वी या उपकेंद्रासाठी नगर शहरापासून जवळच बाभुर्डी मिळालेल्या जागेची तेथे जाऊन त्यांनी पाहणी केली. विद्यापीठाचे उप कुलसचिव एस. जे. बोकेफोडे, सल्लागार समितीचे अध्यक्ष युवराज नरोडे, सिनेटचे सदस्य राजेंद्र विखे, प्रशांत गडाख, अभय आगरकर, डॉ. दयानंद म्हस्के, प्रा. राजेंद्र काळे, शिवाजी साबळे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. गाडे यांनी सांगितले की, नगर येथे उपकेंद्राला ८३ एकर जागा मिळाली आहे. जागेचा ताबा हंस्ताररीत करण्यातील काही प्रक्रिया अजुन अपुर्ण आहे. मात्र येथील उपकेंद्राच्या विकासाचा विकास आराखडा तातडीने तयार करण्यात येणार आहे. त्याच्या बरोबरच संरक्षण भिंतीचे काम सुरू करून ती सहा महिन्यात पुर्ण करण्याचे आश्वासन डॉ. गाडे यांनी दिले. प्रशासकीय इमारत, विद्यार्थी सुविधा केंद्र आदी गोष्टीही तातडीने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. उपकेंद्रासाठी स्वनिधीतून सध्या २ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. गरजेनुसार त्यात वाढ करण्यात येईल असे ते म्हणाले. नगरच्या उपकेंद्राला विद्यापीठात कोणाचही विरोध नाही असा निर्वाळा डॉ. गाडे यांनी दिला. सर्वाचा सकारात्मक दृष्टीकोन आहे असे ते म्हणाले.
दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर राष्ट्रवादी ट्रस्टने पदव्युत्तर विद्यार्थीसाठी निधी संकलीत केला आहे, विद्यापीठाकडूनही त्यासाठी विद्यार्थ्यांच्या याद्या मागवण्यात आल्या, मात्र त्याच्याशी राज्य सरकारचा काही संबंध नाही. राज्य सरकारकडूनही या आठवडय़ात निधी येणे अपेक्षित असून विद्यापीठाच्या पातळीवर कार्यक्षेत्रातील काही गावे शैक्षणिक सुविधेसाठी दत्तक घेता येतील का, याविषयी चाचपणी सुरू आहे असे डॉ. गाडे यांनी सांगितले.
परीक्षा विभागाचे खास ऑडीट
अभियांत्रिकी परीक्षांच्या निकालाला विलंब झाल्याचे मान्य करून, मात्र येत्या आठवडय़ात हे सर्व निकाल जाहीर होतील असा विश्वास डॉ. गाडे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले पीरक्षा विभागाचेच खास लेखा परीक्षण करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून असा निर्णय घेणार देशातील आपले पहिले विद्यापीठ आहे. लेखा परीक्षणाच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार नव्याने रचमा करण्यात येणार आहे.परीक्षा प्रक्रियेतील बऱ्याचशा गोष्टींचे अजुनही संगणकीकरण हेणे बाकी आहे, त्यामुळे काही अडचणी येतात. मात्र येत्या वर्ष, दीड वर्षांत हे काम पुर्ण होऊन मग सर्व अडचणी दूर होतील असे त्यांनी सांगितले.