पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र ते गोपाळनगर पंपिंग स्टेशन आणि पुढे आडगाव जलकुंभास पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे आडगाव जलकुंभास होणारा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे आडगाव जलकुंभावरून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही तसेच शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.
पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रावरून आडगाव जलकुंभास पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीत वाघाडी नाला येथे गळती निर्माण झाली आहे. या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी हाती घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. आडगाव जलकुंभावरून महामार्गाच्या उत्तरेकडील गोपाळनगर, साईनगर, औदुंबरनगर, सरस्वतीनगर, महालक्ष्मीनगर, शरयू पार्क, गजानन पार्क, सागर व निशांत व्हिलेज, धात्रक फाटा परिसर तसेच दक्षिणेकडील अमृतधाम जवळील परिसर, हनुमाननगर, बीडी कामगार वसाहत, स्वामी समर्थनगर, श्रीरामनगर व कोणार्कनगर, आडगाव गावठाण व मळे परिसर, ग्रामीण पोलीस मुख्यालयाचा परिसर या भागांत गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारीही सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.