विजयराज बोधनकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन
चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन १४ मेपासून जहांगीर कला दालनात भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनाचे शीर्षक ‘ह्यूमन इज अ सीड’ असे देण्यात आले आहे. वैचारिक क्रांती करण्यासाठी मानवाला निसर्गाने संधी दिली आहे. या पृथ्वीवर मानव काहीही निर्माण करू शकतो. विचारगर्भ आणि संस्कार यांद्वारे जगात उत्क्रांती करता येऊन जग बदलता येते हा विचार प्रकट करणारी चित्रे विजयराज बोधनकर यांनी आपल्या या प्रदर्शनातून मांडली आहेत.  हे प्रदर्शन २० मेपर्यंत जहांगीर कला दालन, काळा घोडा येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.
‘मास्टर्स’
आर्ट फिनिक्स फाऊण्डेशन या संस्थेतर्फे ‘मास्टर्स’ हे समूह चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे वेगवेगळ्या माध्यमात चितारणाऱ्या चित्रकारांची चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळणार असून हे प्रदर्शन सिमरोझा कला दालन, ब्रीचकॅण्डी रुग्णालयाजवळ, भुलाभाई देसाई मार्ग येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७  या वेळेत पाहायला मिळेल. या समूह प्रदर्शनात सतीश गुजराल, निलाद्री पॉल, सीमा कोहली, सुजाता बजाज, काव्या रेड्डी, एम कुमार, गोपाल सन्याल, दीप्ती सरमळकर, योगेश पाटील, दत्ता बनसोडे, प्रेक्षा लाल, बलजित चढ्ढा, के बी कुलकर्णी आदींच्या चित्रांचा समावेश आहे.
रवींद्रनाथ टागोर यांची चित्रे
राष्ट्रीय आधुनिक कला दालन या काळा घोडा येथील कला दालनात नोबेल पारितोषिक एकमेव भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘द लास्टर हार्वेस्ट’ सध्या सुरू आहे. यामध्ये टागोरांची जवळजवळ शंभर चित्रे पाहायला मिळणार असून मुंबईकर चित्रप्रेमींसाठी ही चांगली संधी आहे. राष्ट्रीय आधुनिक कला दालन, कावसजी जहांगीर सभागृह, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट येथे प्रदर्शन सोमवार वगळता सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत पाहता येईल.
‘मादी’, ‘अजगर आणि गंधर्व’
प्रख्यात नाटककार, पटकथा लेखक विजय तेंडुलकर यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच १९ मे रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंडच्या ऐरोली शाखेतर्फे तेंडुलकरांनी लिहिलेल्या दोन एकांकिकांचे प्रयोग होणार आहेत. ‘मादी’ या एकांकिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केले असून ‘उंच माझा झोका गं’फेम विक्रम गायकवाड व ‘तू तिथे मी’फेम श्रेया बुगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ‘अजगर आणि गंधर्व’ या एकांकिकेचे दिग्दर्शन प्रीतेश सोढा यांनी केले आहे. स्टेजप्लेअर्स थिएटरतर्फे विजय तेंडुलकरांना मानवंदना देण्यासाठी १९ मे रोजी महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड, ऐरोली शाखा, म. बा. देवधर संकुल, सेक्टर १७, ऐरोली येथे प्रयोग होतील. सर्वाना विनामूल्य प्रवेश आहे. संपर्क – २७७९१८३७
 पर्यावरणावर आधारित चित्रपट
पर्यावरण दक्षता मंचतर्फे  शनिवार ११ मे रोजी दुपारी ३.३० ते ६ या वेळेत ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे ‘बायोडायव्हर्सिटी’ या विषयावर चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच संस्थेच्या वतीने अलीकडेच भीमांशकर येथे आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग सहलीचे छायाचित्र प्रदर्शनही या वेळी आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – २५४११६३३.