गोंदिया पंचायत समितीअंतर्गत काही शिक्षक व केंद्रप्रमुख मुख्यालयी न राहता मुख्यालय व नक्षलभत्ता उचलत असल्याचे उघडकीस आले आहे.
मुख्यालयाच्या मुद्यावर वारंवार वादग्रस्त ठरत असलेल्या गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक हे मुख्यालयी न राहत नक्षल भत्त्यांची उचल करत असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी हेही मुख्यालयाला न राहता शासनाला मुख्यालयी राहत असल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, या सर्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली यंत्रणाही निद्रावस्थेत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या एकूण १३६ शाळा असून त्यात ३ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यात शिक्षकांची संख्या शेकडोवर असून त्यांच्या देखरेखीसाठी १४ केंद्रप्रमुख आहेत. सध्या १३ केंद्रप्रमुख १३६ शाळांचा कार्यभार सांभाळत आहेत. या सर्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. तालुक्यात बोळदे-करड, वडेगाव स्टेशन, कोरंभीटोला, महागाव, निमगाव, सिलेझरी, बाक्टी, सुरबन, केशोरी, परसटोला, राजौली, अर्जुनी मोरगाव, असे १४ केंद्र असून यामधील काही केंद्रप्रमुख मुख्यालयी राहत नसले तरी मुख्यालयाचा व नक्षलभत्ता मात्र उचलत असल्याचे समजते. जिल्ह्य़ाच्या किंवा तालुक्यातील नावाजलेल्या शाळांमध्ये असलेल्या आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी हे अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचे प्रामाणिकपणे कबूलही करतात. मात्र, त्यामुळे ग्रामीण भागातील व गरीब घरातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तेव्हा शासनाची फसवणूक करून नक्षलभत्ता व मुख्यालयी भत्त्याची उचल करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना पायबंद घालावा, तसेच त्यांच्यावर कार्यवाही करून मुख्यालयी राहण्याची शक्ती करावी, अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे.