कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाला सध्या उत्पन्नवाढीचे वेध लागले असून पैसे कमविण्याच्या या रेटय़ामुळे उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ांवर मात्र गदा आली आहे. परिवहन उपक्रमात नोकरी करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी वयाची चाळिशी ओलांडली आहे. काही कर्मचारी वयोमानामुळे आजारी असतात. काहींच्या कुटुंबांमध्ये आजारपण आहे. पण कशाचीही पर्वा न करता परिवहन व्यवस्थापनाकडून उत्पन्नवाढीच्या रेटय़ामुळे या कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करणे, त्यांना सुट्टय़ा घेण्यास मनाई करणे, दुहेरी सेवा करण्यास भाग पाडणे असे प्रकार सतत सुरू असल्याच्या तक्रारी आता कर्मचारी करू लागले आहेत. व्यवस्थापनाने मात्र या तक्रारींचा इन्कार केला आहे.  
व्यवस्थापनाकडून सुट्टय़ा मंजूर होत नसल्याने अनेक कर्मचारी दांडय़ा मारतात. कर्मचाऱ्यांनी दांडय़ा मारल्या की त्याचा भार अन्य कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना नाहक दुहेरी सेवा करावी लागते. तसेच  बदली सेवा करावी लागत असल्याने हे कर्मचारी संताप व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे, जादा कामाचे देयक वेळेवर दिले जात नाही, अशी माहिती उपक्रमातील कर्मचाऱ्यांनीच दिली. पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, बस बंद अशा स्थितीत उपक्रमाच्या ताफ्यातील १४५ पैकी फक्त ५० ते ६० बस रस्त्यावर धावतात. नवी मुंबई, भिवंडीकडे जाणारी एखादी बस रस्त्यात बंद पडली की तिकिटावर सह्य़ा घेऊन प्रवासी अन्य बसने प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. या मार्गावर तातडीने बससेवा उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी संताप व्यक्त करून चालक, वाहकाशी भांडणे करतात. या वादाला कंटाळून अनेक वाहक, चालक नवी मुंबई, पनवेल मार्गावरील बससेवेत सेवा देण्यास तयार होत नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. परिवहनमधील कर्मचारी भरतीसाठी अनेक वेळा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. परंतु, त्याकडे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. आतापर्यंत उपक्रमाला सहा ते सात उपव्यवस्थापक लाभले. त्यांनी नोकरभरतीचे प्रस्ताव प्रशासनाकडे ठेवले. परंतु, प्रशासनाने नेहमीच त्याला केराची टोपली दाखविली. त्याचा भार आता अन्य कर्मचाऱ्यांवर पडत आहे. परिवहनच्या टाटाकडून आणलेल्या नवीन बसेस सतत बंद पडत असल्याने कर्मचारी नाराज आहेत.
१५ रुपये तोटा..१ रुपये नफा
कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या बस सध्या किलोमीटरमागे १५ ते १६ रुपये तोटय़ाने चालविल्या जात आहेत. नफ्याचा विचार केला तर एका बसमागे फक्त एक रुपया नफा मिळत आहे. या पूर्वीपासून सुरू असलेल्या टाटाच्या मिनी बस दिवसाला फक्त एक हजार रुपये मिळवून देत आहेत, असे विश्वसनीय सूत्राने सांगितले.