पावसाळ्यात अलिबाग येथील मांडवा व रेवस -मुंबई या दोन्ही धक्क्य़ादरम्यान मुंबई जलप्रवास सेवा बंद करण्यात आलेली आहे.त्यामुळे बारमाही सुरू असणाऱ्या उरण ते अलिबाग दरम्यानच्या रेवस ते करंजा जलप्रवासावरील प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रवासी भार वाढला आहे.मात्र या प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी बोट ह्य़ा जुन्याच असून या बोटीला दोन वेळा अपघात झाल्याच्या घटना घडल्याने पावसाळ्यातील प्रवासाचा धोका वाढला आहे. त्यामुळे करंजा ते रेवस या जलप्रवासासाठी नवीन बोटीची सोय करण्याची मागणी या मार्गावरील प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
मुंबई ते अलिबागदरम्यान रस्त्याचा मार्ग उपलब्ध असला तरी, वाढते दर व या मार्गावरील सातत्याची वाहतूक कोंडी यामुळे अलिबागमधील तसेच मुंबईत राहणारे चाकरमानी जलमार्गालाच अधिक प्राधान्य देतात. पावसाळ्यात समुद्र खवळत असल्याने व रेवस व मांडवा ते मुंबई दरम्यानचे सागरी अंतर अधिक असल्याने या मार्गाने पावसाळ्यात प्रवास करणे धोकादायक आहे.त्यामुळे या दोन्ही मार्गावरील जलप्रवास पावसाळा सुरू होण्यापूर्वीच बंद केला जातो. परंतु या मार्गावरील अलिबाग येथील प्रवाशांसाठी रेवस ते करंजा व मोरा (उरण)ते मुंबई असा मार्ग मात्र बारमाही सुरू असतो. मात्र पावसामुळे समुद्राला उधाण आल्यास हा मार्ग प्रवासासाठी बंद केला जातो. मांडवा व रेवस या दोन्ही बंदरातील जलप्रवास बंद झाल्याने सध्या रेवस ते करंजादरम्यानच्या जलप्रवासातील प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली आहे. हा प्रवास सुरक्षित व्हावा याकरिता रेवस ते करंजादरम्यानची सेवा सुधारावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.