बोधगया येथील साखळी बॉम्बस्फोटांनंतर वेरुळ व अजिंठा लेण्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दर आठवडय़ाला उपअधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याने सुरक्षेचा लेखाजोखा घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. अजिंठा-वेरुळ लेण्यांच्या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्तावही नव्याने पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
वेरुळ येथे हिंदू व बौद्ध लेणी आहेत. बोधगया हल्ल्यानंतर वेरुळ व अजिंठा येथे लेण्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविताना काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी अधिक निधी मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. वेरुळ-अजिंठय़ात प्रत्येकी २५ सीसीटीव्ही कॅमेरे नव्याने आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असलेल्या या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने देश-विदेशातून लोक भेटी देत असतात. त्यांना सुरक्षित वाटावे, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन्ही पर्यटन स्थळांमधील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे प्रभारी ग्रामीण पोलीस अधीक्षक निर्मलादेवी यांनी सांगितले.