नररत्नांबरोबरच भारतभूमी नारीरत्नाचीही खाण आहे, असे उद्गार प्रा. सुशीला मूलजाधव यांनी काढले. रमाई फाऊंडेशन व मासिक ‘रमाई’च्या वतीने आयोजित रमाई जयंती समारंभात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
प्रा. मूलजाधव म्हणाल्या, की चळवळ आम्ही किती पुढे नेली त्यापेक्षा कोणत्या दिशेला नेली हे महत्त्वाचे आहे. दररोज बुद्धविहारात जाऊन वंदना घेऊन भन्तेंना दान देणे म्हणजेच बौद्ध होणे नाही, तर संस्कारमय पिढी निर्माण करण्यासाठी उपासक-उपासिकांनी प्रयत्न करावेत. संस्कारमय कुटुंबातून संस्कारित मुले बाहेर पडतात. स्त्रीचे स्त्रीत्व तिच्या विकासाच्या आड येत नाही. स्त्रिया हुशार असतात, कर्तव्यदक्ष असतात, फक्त त्यांना संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. डॉ. अरुणा लोखंडे म्हणाल्या, की महिलांनी मनुवादी संस्कृतीतून बाहेर येऊन समतावादी तत्त्वज्ञान आत्मसात करावे. स्त्री-पुरुष समता ही बुद्धाने मानलेले पहिले सामाजिक बंधन होय. गुणप्रिया गायकवाड म्हणाल्या, की चळवळीत काम करताना प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारून काम करावे.