भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करीत असून विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करून अर्थव्यवस्थेला आणखी गती देणे शक्य आहे. मोठी स्वप्ने पाहून जे तुम्ही साध्य कराल ते केवळ आपल्या देशालाच नव्हे तर जगालाही उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय केळकर यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. केळकर बोलत होते. हा समारंभ डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. तब्बल १६ पदके आणि पारितोषिके पटकावून मलकापूरच्या सानिया अजाज सय्यद या विद्यार्थिनीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०१व्या पदवीप्रदान समारंभात सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात सानियाचे अभिनंदन केले.
दीक्षाभूमीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाच्या करिष्मा भूषण गवई हिने पाच वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमात १५ पदके व पारितोषिके पटकावली. त्यात ११ सुवर्ण आणि तीन रौप्य पदके तर एक पारितोषिक होते. करिष्मा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. भूषण गवई यांची मुलगी आहे. नागपूर विद्यापीठाच्या एलएलबी तीन वर्षीय अभ्यासक्रमात प्रियंका भाग्यचंद्र ओसवालने एकूण १२ पदके व पारितोषिके पटकावली. त्यात सात सुवर्ण, चार रौप्य पदके आणि एका पारितोषिकाचा समावेश आहे.
वध्र्याच्या यशवंत महाविद्यालयाचा सतीश पुरुषोत्तम मांढरे या विद्यार्थ्यांने पदव्युत्तर इतिहास विषयात सात सुवर्णपदके, एक रौप्य आणि तीन पारितोषिके आणि पदव्युत्तर मराठी विषयात संजीवनी कृष्णराव वरफडे हिने आठ सुवर्णपदके आणि एक पारितोषिक प्राप्त केले. संजीवनीला आठ सुवर्णपदके आहेत. सतीशचे वडील पुरुषोत्तम आणि आई मंदा शेतमजूर असून ते पूर्णपणे अशिक्षित आहेत. सतीशने महाविद्यालाच्या गं्रथालयात अभ्यासकरून नेत्रदीपक यश संपादित केले.
शैक्षणिक भूमिका विचारात घेताना व्याप्ती, गुणवत्ता आणि सर्वसमावेशकतेचा विचार करावा लागेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शिक्षणाची व्याप्ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येईल, असे वातावरण निर्माण व्हायला हवे. पदवीपेक्षा मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी किती होतो हेही महत्त्वाचे आहे. जागतिकीकरणातील आव्हानांना ताबडतोब प्रतिसाद मिळाला नाही तर अभ्यासक्रम कालबाह्य़ ठरू शकतात. त्यामुळे अभ्यासक्रमांमध्ये ताबडतोब बदल होणे अपेक्षित आहे. त्यासाठी महाविद्यालयांना अधिक स्वायत्तता प्रदान करून जास्तीत जास्त गुणवत्ता आणण्यावर विद्यापीठाने भर द्यायला हवा.
मूल्यांकन टाळणारे प्राध्यापक कर्तव्यापासून पळ काढतात. ‘चॉईस बेस क्रेडिट सिस्टिम’ आता प्रत्येक विद्यापीठात अनिवार्य करण्यात आले असून अशा कौशल्यप्रधान मनुष्यबळ निर्मितीची गरज आहे.