विविध क्षमतेच्या तोफांमधून होणारा भडिमार.. लाँचरमधून अचूक लक्ष्यभेद करणारे रॉकेट.. तोफगोळे आणि रॉकेटच्या अव्याहत माऱ्याने उजळलेला फायरिंग रेंजचा परिसर.. या माऱ्यावर लक्ष ठेवणारी वैमानिकरहित विमाने.. चिता व चेतक हेलिकॉप्टरमधून झेपावलेल्या पॅराट्रुपर्सच्या अवकाशातील कसरती..युद्धभूमीवर या सर्वाचे नियोजन करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या ‘साटा’ अर्थात टेहेळणी व लक्ष्य निश्चिती विभागाची अत्याधुनिक उपकरणे..
भारतीय तोफखाना दलाच्या प्रहारक क्षमतेची अशा प्रकारची अनुभूती येथे नेपाळच्या लष्करी शिष्टमंडळाने घेतली. त्यास निमित्त ठरले तोफखाना स्कुलच्यावतीने मंगळवारी आयोजित ‘सर्वत्र प्रहार’चे. भारतीय तोफखाना दलाच्या या शक्ती सामर्थ्यांने हे शिष्टमंडळ चांगलेच प्रभावित झाले.
वेलिंग्टनचा ‘डिफेन्स सव्‍‌र्हिस स्टाफ’ आणि पुण्याच्या मिलिटरी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील लष्करी अधिकारी, एनसीसी कॅडेट, शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. तोफखाना स्कुलच्यावतीने दरवर्षी या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येते. देवळाली कॅम्पलगतच्या फायरिंग रेंजवर सलग दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात तोफखाना दलाची मुख्य भिस्त सांभाळणारी १५५ एम. एम. बोफोर्स, १२० एम. एम. मॉर्टर, १०५ एम. एम. इंडियन फिल्ड गन आणि १०५ एम. एम. लाईट फिल्ड गन या तोफा सहभागी झाल्या होत्या. तसेच एकाचवेळी ४० रॉकेट डागण्याची क्षमता असणारे १२२ एम. एम. मल्टीबॅरल रॉकेट लाँचर आणि चिता, चेतक हेलिकॉप्टरच्या कामगिरीचे दर्शन घडविण्यात आले. तोफखाना स्कुलच्या गौरवशाली परंपरेला साजेशा पद्धतीने सकाळी प्रमुख मान्यवरांचे आगमन झाल्यावर मल्टीबॅरल लाँचरमधून रॉकेट डागून दिमाखदार पद्धतीने सलामी देण्यात आली. याप्रसंगी हवाई संरक्षण विभागाच्या (देवळाली) लेफ्टनंट जनरल तोफखाना स्कुलचे कमांडन्ट ए. के मिश्रा उपस्थित होते.
यंदाच्या कार्यक्रमाचे वैशिष्टय़े म्हणजे नेपाळचे उपस्थित लष्करी शिष्टमंडळ. भारतीय तोफखाना दलाच्या प्रहारक क्षमतेने त्यांनाही अक्षरश: भुरळ पाडली. भारतीय तोफखाना दलाकडे असणाऱ्या वेगवेगळ्या आयुधांची ओळख व क्षमता या निमित्ताने अधोरेखीत केली जाते. प्रात्यक्षिकात विविध क्षमतेच्या तोफा व रॉकेट लाँचर सहभागी झाले. तोफखान्याच्या भात्यात समाविष्ट झालेल्या पिनाका, स्मर्च या रॉकेट लाँचरसह ब्राम्होस क्षेपणास्त्राचे मॉडेल सादर करण्यात आले. त्यांचे प्रात्यक्षिक दाखविणे या फायरिंग रेंजवर शक्य नव्हते. त्यांची मारा करण्याची क्षमता ९० किलोमीटर असून कमी अंतराच्या रेंजवर प्रात्यक्षिके सादर करणे अवघड असल्याचे कारण होते. २९० किलोमीटरवर मारा करण्याची क्षमता असणारे सुपरसोनिक ‘ब्राम्होस’ क्षेपणास्त्रही तोफखाना दलाकडे दाखल झाले असून त्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी, हेलिकॉप्टर व खेचरावरून मैदानात आणलेल्या तोफांच्या सुटय़ा भागांची जवानांनी काही मिनिटात बांधणी केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने भडिमार सुरू झाला. बोफोर्स ही तर तोफखाना दलाची सर्वात अत्याधुनिक तोफ. मैदानावरील विविध क्षमतेच्या तोफांमध्ये या तोफेने आपला बाज अधोरेखीत केला आहे. कारगील युद्धात महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या या तोफेची प्रहारक क्षमता पुन्हा एकदा पहावयास मिळाली. एका मिनिटात आठ ते दहा स्मोक किंवा हाय एक्स्प्लोझिव्ह बॉम्बचा मारा करू शकणाऱ्या १२० एम. एम. मॉर्टर गनने आपली क्षमता सिद्ध केल्यानंतर १०५ एम. एम. इंडियन फिल्ड गन, लाईट फिल्ड गन यांनी भडिमाराचे कसब दाखविले. प्रत्येकीच्या क्षमतेनुसार डागलेले गोळे अवघ्या २० ते ४५ सेकंदात लक्ष्यावर जाऊन आदळले. त्यानंतर रॉकेट लाँचरने एकापाठोपाठ एक केलेल्या फायरिंगने सर्वाना आश्चर्यचकीत केले. तोफगोळ्यांच्या माऱ्याने फायरिंग रेंज परिसर अक्षरश: उजळून निघाला. याचवेळी बिनतारी यंत्रणेद्वारे विशिष्ट संदेश देण्यात आला. त्यामुळे सावध झालेले तोफांवरील जवान अवघ्या तीन ते पाच मिनिटांत सज्ज झाले. पाचव्या मिनिटाला तर विविध बनावटीच्या तोफांनी लक्ष्यावर जोरदार मारा केला. तोफखाना दलाच्या भाषेत त्यास ‘अग्नी वर्षांव’ असे म्हटले जाते. यामुळे फायरिंग रेंजचा डोंगर परिसर धुराने वेढला गेला होता. या प्रात्यक्षिकाद्वारे तोफखाना दल अतिशय अल्प काळात कशा पद्धतीने कार्यान्वित होऊ शकते याची माहिती दिली गेली.
विशेष म्हणजे फायरिंगची वेगवेगळी क्षमता असणाऱ्या तोफा एकाचवेळी लक्ष्यावर अचूक मारा करू शकतात असेही दिसून आले. दुसरीकडे, डागलेल्या तोफगोळ्यांवर जमिनीवरून दिसू न शकणारी वैमानिकरहित विमाने लक्ष ठेवून होती. अचूक लक्ष्यभेद झाल्याची माहिती लगेच त्यांच्याकडून छायाचित्रांद्वारे उपलब्ध करून दिली गेली. फायरिंग रेंजच्या परिसरात चिता हेलिकॉप्टरने अगदी जमिनीजवळून उडण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर ध्रुव हेलिकॉप्टरमधून पाच ते सहा हजार फूट उंचीवरून पॅराट्रुपर्सने उडी मारून हवेतील कसरती सादर केल्या. तोफखाना दलाच्या टेहेळणी व लक्ष्य निश्चिती विभाग अर्थात सव्‍‌र्हिलन्स व टारगेट अ‍ॅक्विझिशन विंग (साटा) कडून वापरल्या जाणाऱ्या लोरोज, एएनटीपीक्यू यासारख्या टेहेळणी यंत्रणाही प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.