दहीहंडी फोडताना जायबंदी होणारा गोविंदा अथवा गणेश विसर्जनाच्या वेळी जखमी होणाऱ्या कार्यकर्त्यांला मुंबई महापालिकेकडून मदत मिळविण्यासाठी संबंधित मंडळाचे सभासद असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. त्याचबरोबर घडलेल्या अपघाताची जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदही करावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर पालिका रुग्णालयात उपचार घेतले तरच या जखमींना पालिका आर्थिक मदत करणार आहे. मात्र दहीहंडी फोडण्यास मुंबईबाहेर जाणाऱ्या अथवा बाहेरून मुंबईत आलेल्या पथकांतील गोविंदांना ही मदत मिळणार नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये दहीहंडीला उंच मानवी मनोरे रचण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे गोविंदा जखमी होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सर्वसामान्य कुटुंबांतील गोविंदांना अशा प्रकारे जखमी झाल्यावर दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच जायबंदी गोविंदा आणि गणेशभक्तांना पालिकेने आर्थिक मदत करावी, या मागणीने गेल्या वर्षी जोर धरला होता. पालिका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या अशा गोविंदा अथवा गणेशभक्ताला १० हजार रुपये, तर दहीहंडी फोडताना किंवा विसर्जन करताना मृत्युमुखी पडणाऱ्याच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांची मदत देण्याची तयारी प्रशासनाने दाखविली. मात्र शिवसेनेने पाठपुरावा करीत ही रक्कम अनुक्रमे १५ हजार रुपये व १.५० लाख रुपये केली.
जखमी झालेल्या गोविंदा अथवा गणेशभक्तांना पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पालिका रुग्णालयातच उपचारासाठी दाखल व्हावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना १५ हजार रुपयांची मदत मिळू शकेल. मुंबईतील अनेक गोविंदा पथके ठाणे, नवी मुंबईत जातात. तसेच तेथील गोविंदा पथकेही मुंबईत येतात. मात्र या गोविंदांना महापालिकेच्या योजनेचा लाभ मिळणार नाही.