नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या वतीने जागतिक जलदिनानिमित्त येथील सागरमल मोदी शाळेत   आयोजित कार्यक्रमात सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी पाणी बचतीची शपथ घेतली. तर, जलदूतांचा यावेळी गौरव करण्यात आला.
क. का. वाघ शिक्षण संस्थेचे बाळासाहेब वाघ यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संस्थेकडून विद्यार्थ्यांसाठी पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम प्रेरणादायक असल्याचे सांगितले. जलसंस्कृती मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. पाणी जीवन असल्याने पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानी जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर होते.
यावेळी जलसाक्षरता अभियान व विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ऊर्जा फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय बोरस्ते, भरत कावळे, त्र्यंबकच्या नगरसेविका ललिता शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्तविक प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी केले. सर्व उपस्थितांना अजय बोरस्ते यांनी जलप्रतिज्ञा दिली. परिचय व सूत्रसंचालन दिलीप अहिरे यांनी केले. यावेळी जलदूतांचा गौरव करण्यात आला.
सरोजिनी तारापूरकर, दिनेश देवरे, सविता खरे, रत्नप्रभा सूर्यवंशी, सी. एम. कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पाणी बचतीचा संदेश देणारे पथनाटय़ सादर करण्यात आले. राजेंद्र निकम यांनी आभार मानले.