ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरू केलेली धर्मातराची चळवळ थांबवावी, यवतमाळजवळील लासिना येथे खरेदी केलेल्या जमिनीची आणि त्या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध बांधकामाची चौकशी करावी, परदेशातून मिळवत असलेल्या पैशाच्या आधारावर धर्मातर चळवळ करणाऱ्या सुनील सरदार व नितीन सरदार या बंधूंना अटक करावी, यासाठी ‘रास्ता रोको’ करणाऱ्या माजी खासदार जांबुवंतराव धोटे आणि त्यांच्या ३२ कार्यकर्त्यांना यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली. धोटे यांच्या अटकेचे वृत्त समजताच नेताजी चौकातील धोटे यांच्या विदर्भ जनता काँग्रेस कार्यालयाजवळ शेकडो नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आणि या परिसरातील सर्व दुकाने आणि बाजारपेठ बंद झाली. उल्लेखनीय म्हणजे, नितीन सरदार यांच्या तक्रारीवरून एक महिन्यापूर्वी जांबुवंतराव धोटे यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणाची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. दरम्यान, धोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ-अमरावती मार्गावर लासिना येथे ‘रास्ता रोको’ करून वाहतूक ठप्प केली. ठाणेदार गायगोले आणि ग्रामीण पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचल्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन बंद करण्याची विनंती ठाणेदारांनी धोटे यांना केली, पण ‘रास्ता रोको’ सुरूच राहील, अशी भूमिका धोटे यांनी घेतल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या ३२ कार्यकर्त्यांना यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अटक करून यवतमाळात आणले. धोटे यांचा गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे धोटेंसह अटक केलेल्या सर्व कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती ठाणेदार गायगोले यांनी दिली. सायंकाळी उशिरा शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.