जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानाच्या टप्पा दोनमध्ये औरंगाबाद शहराचा समावेश करावा, या मागणीसाठी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे शिष्टमंडळ मंगळवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटले. महापौर कला ओझा व पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री अजय माकन यांच्याशी चर्चा केली. जगप्रसिद्ध अजिंठा-वेरुळ लेणी व अनेक ऐतिहासिक स्थळे शहरालगत असल्याने देश-विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात या शहरात येतात. त्यामुळे शहराच्या पायाभूत विकासात भर पडावी, यासाठी ही योजना तातडीने सुरू करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
शहराची लोकसंख्या ११ लाख ७५ हजार एवढी असून दरवर्षी ७ लाख विदेशी पर्यटकांपैकी ५० हजारांहून अधिक पर्यटक शहराला भेट देतात. लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पूर्वी १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असल्याने शहराचा समावेश पुनरुत्थान अभियानात झाला नव्हता. नव्याने लोकसंख्या वाढलेली असल्याने त्या निकषात शहराची गणना होऊ शकते, असे शिष्टमंडळाच्या सदस्यांनी पंतप्रधान व केंद्रीय मंत्री माकन यांच्या लक्षात आणून दिले. नागरी पुनरुत्थान योजनेत शहराचा समावेश झाला तर अधिक सोयी पुरविल्या जाऊ शकतील, ज्यामुळे विकासाला चालना मिळेल, असे महापालिकेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुंबई-दिल्ली कॉरिडोरमध्ये हे शहर येत असल्याने त्यामुळे विकासाला चालना मिळेल व दर्जेदार सुविधा मिळू शकतील. त्यामुळे टप्पा दोनमध्ये शहराचा समावेश करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर महापौर कला ओझा व अन्य पदाधिकाऱ्यांच्या सह्य़ा आहेत. मंगळवारी पंतप्रधानांना भेटलेल्या शिष्टमंडळात महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी यांच्यासह विकास जैन, रेणुकादास वैद्य, डॉ. जफर खान, गिरजाराम हळनोर व मुख्य अभियंता सिकंदर अली यांचा समावेश होता. १२ डिसेंबरला लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी शहराचा समावेश टप्पा दोनमध्ये करण्याचे आश्वासन दिल्याची आठवणही खासदार खैरे यांनी आवर्जून सांगितली.   

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप