जेएनपीटी बंदरातील कामगारांनी एका क्रेनने एका पाळीत तब्बल ३६५ कंटेनर हाताळून आपली क्षमता सिद्ध केली असून यापूर्वी बंदरात ४२४ कंटेनर हाताळण्याचा विक्रम करण्यात आलेला होता. जेएनपीटी बंदरातील कामगार हे काम न करताच पगार घेतात, अशी प्रतिमा तयार झाल्याने तसेच खासगी बंदराच्या तुलनेने कंटेनर हाताळण्याची कमी क्षमता असल्याने जेएनपीटी बंदराचे कापरेरेशनमध्ये रूपांतरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याला या कामगारांनी आपल्या कामातून चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सध्या जेएनपीटी बंदरात जेएनपीटीसह दुबई पोर्ट वर्ल्ड (एनएसआयसीटी) तसेच गेटवे टर्मिनल ऑफ इंडिया (जीटीआय) हे दोन खासगी बंदर आहेत. ३३० मीटरच्या तिसऱ्या खासगी बंदराचे काम सुरू आहे. बंदरातून सध्या वर्षांला ५० लाख कंटेनरची हाताळणी केली जाते.
यामध्ये जीटीआय या खासगी बंदरातून वर्षांला सर्वाधिक कंटेनरची हाताळणी केली जात आहे. दुसऱ्या क्रमांकावर दुबई पोर्ट वर्ल्ड व तिसऱ्या क्रमांकावर जेएनपीटी बंदर आहे. जेएनपीटी बंदरातील क्रेन्स जुन्या झाल्या असून दोन्ही खासगी बंदरातील क्रेन्स अत्याधुनिक आहेत. जेएनपीटी बंदरातील क्रेन्स बदलून अत्याधुनिक क्रेन आणण्याची मागणी अनेक वर्षांपासून येथील कामगार संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. नव्याने तीन नवीन क्रेन जेएनपीटी बंदरात बसविण्यात आल्या आहेत. मात्र त्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. जुन्याच क्रेनच्या साह्याने जेएनपीटीमधील डी. बी. गवई व एल. के. ठाकूर या दोन क्रेनचालकांनी एका पाळीत ३६५ कंटेनर हाताळले असल्याची माहिती जेएनपीटीचे अतिरिक्त व्यवस्थापक एस. ए. साळुंखे यांनी दिली आहे.