बारबालांच्या रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारबाबत दिलेला निर्णय योग्यच आहे. त्याचे स्वागतच करावे लागेल, असे आम आदमी पार्टीच्या राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनी सांगितले.
सुमारे ७० हजार महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. नृत्य कधीच वाईट नसते. त्यातील अश्लीलपणा थांबविण्यास पोलिसांनी नियम ठरवून द्यायला हवेत. त्याची अंमलबजावणीही व्हावी, अशी आम आदमीची भूमिका असल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले. पंचतारांकित हॉटेलमध्ये नृत्यावर बंदी येत नाही. मात्र, बारमधील नृत्य अनतिक ठरवून गृहमंत्री आर. आर पाटील यांनी स्वतची प्रतिमा अधिक नीतिमान बनवून घेतली. या प्रश्नाच्या सामाजिक पलूंचा एकाही राजकीय पक्षाने अभ्यास केला नाही. त्यामुळे अन्य राजकीय पक्षांकडून होणारा विरोध चुकीचा असल्याचा दावा दमानिया यांनी केला. केवळ रोजगार बुडतो म्हणून या निर्णयाचे स्वागत करायचे असेल, तर गुटखा, मटका, अवैध दारू हे धंदेही चालू राहावेत, अशी भूमिका कितपत योग्य आहे, असा प्रश्न विचारला असता हा निर्णय सांगोपांग विचार करून झाला आहे. नृत्य व इतर धंदे यात फरक असल्याचे दमानिया म्हणाल्या.
नृत्यातून आनंद, बंधुभाव व देशभक्ती व्यक्त होते. त्यामुळे नृत्याला बंदी घालणे चुकीचेच आहे. त्यात अश्लील काही असेल तर त्याचे नियमन करायला हवे, अशी आम आदमी पार्टीची भूमिका आहे. जालना येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या पार्थ सनिक स्कूलसाठी ८ एकर जागा माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या प्रभावामुळे सरकारने नियमबाह्यपणे दिली असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
अंकुशराव टोपे यांच्या
पार्थ सैनिक शाळेस नोटीस
वार्ताहर, जालना
शहरातील खरपुडी येथील पार्थ सैनिक शाळेच्या प्राचार्याना अतिक्रमण काढून टाकण्यासंदर्भात तहसीलदारांनी नोटीस बजावली.
शाळेने मंजूर जागेव्यतिरिक्त ७६ आर, तसेच नैसर्गिक व कृत्रिम तलावांना संरक्षण भिंत बांधून १ हेक्टर ९६ आर क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याचे नोटिशीत म्हटले आहे. सात दिवसांत हे अतिक्रमण काढले नाही तर कायद्यानुसार ते हटविण्याचा इशारा नोटिशीत दिला आहे. आम आदमी पार्टीच्या राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनी बुधवारी या अतिक्रमणासंदर्भात जिल्हाधिकारी श्याम देशपांडे, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अतिक्रमणासंदर्भात महसूल विभागाने पार्थ सैनिक शाळेस नोटीस काढावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
बैठकीनंतर दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सैनिकी शाळेने ३० एकर जागा मंजूर असताना प्रत्यक्षात आठ एकर जागा अधिक ताब्यात घेतली. शासकीय मालकीचे दोन तलाव शाळेच्या संरक्षण भिंतीच्या आत आहेत व या परिसरातून जाणारा रस्ताही शाळेच्या ताब्यात असल्याचा आरोप केला. आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक कैलास फुलारी यांची उपस्थिती या वेळी होती. मंगळवारी दमानिया सैनिकी शाळेच्या परिसरात आल्या होत्या. या वेळी मोठा बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, शाळेच्या परिसरातील स्मशानभूमीच्या ७८ गुंठे जमिनीचा ताबा स्थानिक ग्रामपंचायतीस देण्यात आला असल्याचे तहसीलदार वळवी यांनी सांगितले.
शाळेचे अध्यक्ष अंकुशराव टोपे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, एखाद्या संस्थेने सरकारने जमीन दिल्यावर तिची मोजणी करून देण्याचे काम संबंधित शासकीय यंत्रणा करीत असते. जमिनीच्या मोजणी करण्याशी संस्थेचा संबंध नसतो.