मूळ बदलापूरकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोळे कुटुंबीयांनी शहरवासीयांना अत्यंत गरजेच्या असणाऱ्या सुविधा माफक दरात उपलब्ध व्हाव्यात या हेतूने काका गोळे फाऊंडेशनची स्थापना केली आहे. शुक्रवारी सकाळी विजयादशमीच्या मुहुर्तावर शिवाजी चौक येथे फाऊंडेशनच्या वतीने अद्ययावत पॅथॉलॉजी लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचबरोबर फाऊंडेशनच्या माध्यमातून संकल्प स्टडी सेंटर आणि अभ्यासिकाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी कुळगाव येथील शिवाजी चौकात गोळे कुटुंबाने दोन हजार चौरस फुटांची जागा दिली असून ती दसऱ्यानिमित्त लोकार्पण करण्यात आली. या जागेत पाच दालने आणि बाहेर शंभर जण बसू शकतील असे एक खुले अ‍ॅम्पी थिएटर आहे.
बदलापूरच्या जडणघडणीचे साक्षीदार असणाऱ्या आशीष गोळे यांनी त्यांचे आजोबाकाका गोळे यांच्या स्मृत्यर्थ या फाऊंडेशनची स्थापना केली आहे. पूर्णत: संगणकीकृत असणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये सर्व वैद्यकीय चाचण्या अवघ्या ४० टक्के दरात उपलब्ध असणार आहेत. एक दालन स्टडी सेंटरसाठी असून त्यात स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन, इंग्रजी सुधारणा वर्ग आदी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. एक दालन अभ्यासिकेसाठी आहे. सकाळी १० ते रात्री नऊपर्यंत ही अभ्यासिका आठवडय़ाच्या सर्व दिवशी खुली असणार असून त्यात ४० विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. फाऊंडेशनने या सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. फाऊंडेशनच्या वास्तूबाहेरील अ‍ॅम्पी थिएटर संकल्प खुला मंच म्हणून ओळखला जाईल. शहरातील सर्व सामाजिक तसेच राजकीय संस्थांना हे व्यासपीठ विधायक उपक्रमांसाठी खुले असणार आहे.