काळूबाईच्या नावानं चांगभलंच्या गजरात मांढरदेव येथील काळूबाईच्या यात्रेला मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली. यावर्षीच्या यात्रेने भाविकांच्या गर्दीचा उच्चांक मोडला.
मांढरदेव येथील काळूबाईची यात्रा शनिवारी सुरू झाली. यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरात महापूजा बांधण्यात आली होती. ट्रस्टचे चेअरमन सातारा येथील जिल्हा न्यायाधीश अरुण दिगंबर उपाध्ये, ट्रस्टचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी. पी. जोशी प्रशासकीय विश्वस्त प्रांताधिकारी सूरज वाघमारे, तहसीलदार सुनील चंदनशिवे, विश्वस्त अ‍ॅड. मिलिंद ओक, अ‍ॅड. महेश कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी भास्कर धस, फत्तूलाल नायकवाडी, मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार कुमार खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता महेश तपासे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावर्षी पौषपौर्णिमा शनिवार-रविवार विभागून आल्याने भाविकांनी यात्रा शनिवारीच पहाटेपासून सुरू केली होती. शनिवार सकाळपासून मांढरगडाकडे जाणारे रस्ते गाडय़ांनी भरून वाहत होते. परंपरेप्रमाणे रविवारी सकाळीच ट्रस्टच्या वतीने महापूजा बांधण्यात आली. यावर्षी भाविकांचा खूपच उत्साह असल्याचे जाणवले. शुक्रवार, शनिवार, रविवार सलग सुट्टय़ा आल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुंबई, पुणे, बारामती, नगर, शिरूर, बीड, सातारा, सोलापूरसह कर्नाटकातील भाविक मोठय़ा संख्येने दाखल झाले होते. ट्रस्टने यात्रेचे नियोजनही चांगले केले होते. भाविक, देव्हारा घेऊन येणाऱ्यांना त्या त्या दर्शनबारीतून दर्शन होत होते.
यात्रेनिमित्ताने वेगवेगळ्या वस्तूंच्या दुकानांची रेलचेल होती. वाद्य वाजविण्यास बंदी असल्याने गडावर वाद्य वाजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या २२ जणांवर कारवाई करण्यात आली. यात्रेच्या नियोजनासाठी दोन पोलीस उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षक आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक सव्वादोनशे पोलीस तसेच राज्य राखीव दलाची एक तुकडी अनिरुद्ध आपत्ती व्यवस्थापनचे तीनशे कार्यकर्ते यात्रेच्या काम करीत आहेत. यात्रा नियोजनामुळे भाविक झटपट दर्शन आटोपून परतीच्या मार्गावर आहेत.