सांगलीच्या महापौरपदासाठी काँग्रेसच्या वतीने कांचन कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुभांगी देवमाने यांनी गुरुवारी उमेदवारी दाखल केली. महापौर, उपमहापौर निवडण्यासाठी  दि. १४ ऑगस्ट रोजी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या वतीने  प्रशात पाटील-मजलेकर आणि राष्ट्रवादीतर्फे धीरज सूर्यवंशी, जुबेर चौधरी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
नुकत्याच झालेल्या सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीप्रणीत विकास महाआघाडीची सत्ता संपुष्टात आणून एकहाती विजय मिळविला. महापालिकेच्या ७८ सदस्यांमध्ये काँग्रेसचे ४१ सदस्य असून महापौर, उपमहापौर निवडीसाठी काँग्रेसला यातायात करावी लागणार नाही. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडणुकीत काँग्रेसला सहजासहजी यश मिळणार आहे.
महापौरपदासाठी काँग्रेसमधून सहाजणांनी दावेदारी सांगितली होती. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांची बठक घेऊन विचारविनिमय केला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या या बठकीत महापौर, उपमहापौर निवडीचे सर्व अधिकार  मदन पाटील यांना देण्यात आले. गुरुवारी सकाळी पाटील यांनी महापौरपदासाठी कांचन कांबळे आणि उपमहापौरपदासाठी प्रशांत पाटील-मजलेकर यांना संधी देत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार दोघांनी दुपारी महापालिकेत येऊन आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
दरम्यान, स्वीकृत सदस्य निवडीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये राजकीय वाक्युद्ध जुंपले आहे. दोन अपक्ष नगरसेवक उमेश पाटील आणि  सुनीता पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकृत सदस्याच्या मिळणाऱ्या दोन जागांवर संक्रात आली आहे. स्वाभिमानी आघाडीला पाठिंबा देणारे दोन्ही नगरसेवक काँग्रेसचे बंडखोर म्हणून ओळखले जातात. त्यामुळे महापालिकेतील राष्ट्रवादीची ताकद कमी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी केला आहे.
महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी महापौर-उपमहापौर निवडीनंतरच जाहीर होणार आहेत. स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच असून संख्याबळानुसार काँग्रेसच्या वाटय़ाला तीन जागा मिळणार आहेत. उर्वरित दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. ७८ सदस्यांच्या महापालिकेत काँग्रेसचे ४१, राष्ट्रवादीचे १९, स्वाभिमानी विकास आघाडीचे ८, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १ आणि अपक्ष ९ असे संख्याबळ आहे. अपक्ष ९ पकी ६ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. तर एका अपक्षाने काँग्रेसला आणि दोन अपक्षांनी स्वाभिमानी विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.