मराठीतील संतकवींपासून ते कवयित्री बहिणाबाई यांच्यापर्यंत विविध कवींनी लिहिलेल्या कविता व रचनांचे संकलन असलेला ‘महाराष्ट्र भाषेतील कवितांचे वेचे- नवनीत’ हा दुर्मिळ ग्रंथ घुमान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा प्रकाशित करण्यात येणार आहे. १८५४ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या या ग्रंथाची शेवटची आवृत्ती १९५७ मध्ये प्रकाशित झाली होती. अलीकडच्या काही वर्षांत हा ग्रंथ उपलब्ध नव्हता, ही उणीव आता भरून निघणार आहे.
घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजक संस्था ‘सरहद’ आणि ‘चिनार पब्लिकेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा आणि साहित्यातील दस्तऐवज ठरलेल्या या ग्रंथाचे पुन्हा प्रकाशन केले जाणार आहे. ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांच्या मूळ कल्पनेतून हा ग्रंथ पुन्हा उपलब्ध होणार आहे. घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि गोखले यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे.
 परशुराम बल्लाळ गोडबोले यांनी ‘महाराष्ट्र भाषेतील कवितांचे वेचे-नवनीत’ या नावाने संकलित केलेला हा ग्रंथ पुणे पाठशाळा छापखान्याने पहिल्यांदा प्रकाशित केला होता. त्यानंतर जवळपास शंभर वर्षांनी म्हणजे १९५४ मध्ये तात्कालीन मुंबई राज्याच्या शिक्षण विभागाच्या मराठी संशोधन मंडळाकडून त्यात काही नव्याने भर टाकून तो पुन्हा प्रकाशित करण्यात आला. गेल्या ६०-६५ वर्षांपासून हा ग्रंथ उपलब्ध नव्हता.  
६०० पानांच्या या मूळ ग्रंथात संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, चोखामेळा, समर्थ रामदास स्वामी यांच्या रचना, अभंगांबरोबरच कवी/शाहीर अनंतफंदी, गोविंदाग्रज, मोरोपंत, कवी श्रीधर, रघुनाथ पंडित, मुक्तेश्वर, शेख महंमद, क्रिस्टदास तोमाल स्टिफन, विष्णुदासनामा, महिपती, नरहरी, बहिणाबाई आणि अन्य कवींच्या निवडक रचनांचे संकलन करण्यात आले आहे. मराठी भाषेचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि पुस्तकप्रेमींसाठी दुर्मिळ असलेला हा ग्रंथ आम्ही पुन्हा प्रकाशित करत असल्याचे ‘सरहद’चे संजय नहार यांनी सांगितले. मराठी कविता, अभंग यांचे संकलन असलेला १८५४ मध्ये प्रकाशित झालेला हा पहिलाच संग्रह असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. गोडबोले यांच्यानंतर या ग्रंथाच्या काही आवृत्त्या निघाल्या. अ. का. प्रियोळकर यांनी अलीकडे काही वर्षांपूर्वी त्यात काही भर घालून संकलन केले. मराठी कविता नेमकी कशी होती, तिच्यात कसा बदल होत गेला, हे यातून अभ्यासायला मिळते. नव्याने प्रकाशित होणाऱ्या ग्रंथात प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण हा सर्व परिचय/ओळख करून देणार असल्याचे डॉ. मोरे म्हणाले.