एकीकडे नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाच्या डाव्या, उजव्या कालव्यांचे पाणी पळविले जात असताना नगर जिल्ह्य़ातील नेते व कार्यकर्त्यांनी कालव्याला पाणी सुरूच ठेवावे, अशा आशयाचे निवेदन गोदावरी महामंडळातील अधिकाऱ्यांना दिले. कोपरगावचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शंकरराव कोल्हे यांनी औरंगाबादेत काही विधिज्ञांशीही चर्चा केल्याची माहिती मिळाली. दरम्यान, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, राहाता येथील नेते आणि कार्यकर्त्यांनी गोदावरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना अव्यवहार्य निर्णय घेऊ नका, असा सल्ला देत निवेदन दिले.
दरम्यान, नांदूर-मधमेश्वर डाव्या कालव्यातून ६०९ क्युसेक व उजव्यातून २२९ क्युसेक पाणी वळविले. गोदावरी महामंडळाशी संपर्क साधल्याशिवाय अशाप्रकारे पाणी वळवू नये, अशा सूचना कार्यकारी संचालकांनी दिल्या. मात्र, या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. पाणी सुरू असतानाच शेतीचे पाणी कसे आवश्यक, या बाबत निवेदन सादर करण्यात आले. गोदावरीच्या ऊध्र्व भागात मुळा व प्रवरामध्ये ऑगस्टपर्यंत पाऊस पडतो. हा प्रदेश कमी पावसाचा असून सरासरी ४०० मिमी पाऊस पडतो. तुलनेने जायकवाडीत परतीचा पाऊस अधिक पडतो. वरच्या भागातून पाणी सोडले व परतीच्या पावसानेही जोर दिल्यास जायकवाडी भरेल व ऊध्र्व भागातील धरणे कोरडी पडतील, असे निवेदनात म्हटले आहे. जायकवाडी भरले तरी त्याचा वरच्या धरणांना उपयोग होणार नाही. त्यामुळे परंपरेने पाणी सोडण्याची प्रथा मोडू नये, असे या नेत्यांनी अधिकाऱ्यांना आवर्जून सांगितले.
दरम्यान, पाणीप्रश्नी कोपरगावचे नेते अधिक सक्रिय झाले आहेत. जायकवाडीत ३३ टक्के पाणी येत नाही तोपर्यंत हे धरण ‘तुटी’चे समजले जाणार आहे. पिण्यासाठी पाणी देण्यास विरोध नसल्याचेही निवेदनात आवर्जून नमूद केले आहे. कोणताही अव्यवहार्य निर्णय गोदावरी मंडळातील अधिकाऱ्यांनी घेऊ नये, याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे. साखर कारखाना अध्यक्षांसह दत्तात्रय शिरसाट, रंगनाथ आंधळे यांच्या निवेदनावर सह्य़ा आहेत. २७५ पेक्षा अधिक सह्य़ांचे हे निवेदन देण्यात आले. हा प्रश्न अधिक आक्रमक मांडणार असल्याचे संकेत नगर जिल्ह्य़ातील नेत्यांनी दिले.