अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे एकमेकांमधील संवाद सोपा झाला असला तरी मानवी भावभावना यामुळे संकुचित झाल्या आहेत. भावभावनांचे जसे तसेच अक्षरांचे झाले आहे. ‘विना कागद’ अर्थात पेपरलेसच्या जमान्यात साहित्य, अक्षर लिपी काहीशी बाद झाली आहे. मात्र येथील चित्रकार नंदू गंवादे यांच्या संकल्पनेतून कॅलिग्राफीचा आधार घेत अक्षरसौंदर्य आणि आशयघनता यांचा मिलाफ असलेले ‘कुसुमाक्षरे’ हे अनोखे चित्रप्रदर्शन मराठी भाषा दिनानिमित्त २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत हार्मनी आर्ट गॅलरी येथे भरविण्यात येत आहे.
मराठी दिनाचे औचित्य साधत कुसुमाक्षरांची संकल्पना गवांदे आणि त्यांची सहकारी सायली आचार्य यांनी प्रत्यक्षात उतरविली. मराठी माणसाच्या मनात कुसुमाग्रजांविषयी असलेली आत्मियता, त्यांच्या लेखनीतील सहजता. वाचतांना वास्तवाशी जवळून ओळख करून देणारे त्यांची पात्र. कविता आदींनी मराठी मनावर गारूड केले आहे. कुसुमाग्रजांच्या कविता आशयसंपन्न साहित्य प्रकार. मानवी भावभावनांच्या तरंग लहरी, जगणे, मरणेज नव्हे तर मृत्यूपश्चत जगणे याची अनुभूती कवितेच्या माध्यमातून येते. प्रेम, विरह, तारूण्य, वार्धक्य, अध्यात्म, अंधश्रध्दा, मूर्तीभंजन, मानवी स्वभावविभाव, दैन्य अनेक विषय मानवी भाव भावनांना शब्दांकित होत असतांना कुसुमाग्रजांची लेखनी समुद्राच्या अवखळ लाटांप्रमाणे होते. त्यात चैतन्य आहे तसेच दाहकतेचे निखारे, आशा आहे, तशी वावटळही.. याचा प्रत्यय देणाऱ्या कुसुमाग्रजांच्या प्रेम विषयक कवितेतील शीर्षकातून ओतप्रोत प्रेमच व्यक्त होते. कणा कविता हूरहूर लावत प्रेरणा देते तर मृत्यूचे चिंतन व्यक्त करणाऱ्या कवितेतील अक्षरे खरोखरच संन्याशासारखी विरक्त, तुटक झाल्यासाठी वाटतात. त्या आशय संपन्न, शब्दघनता असलेल्या कवितांना योग्य न्याय मिळावा हे आव्हान पेलत गंवादे यांनी कुसुमाक्षराची मांडणी केली. त्यांच्या निवडक कवितांना कॅलीग्राफीकल साज चढवत त्यातील आशयघनता वाचकांच्या थेट हृदयापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदर्शनास नाशिककर साहित्यप्रेमींनी भेट द्यावी असे आवाहन हार्मनी आर्ट गॅलरीने केले आहे.