एखादा विषय विद्यार्थ्यांपर्यंत सुलभ रितीने व नेमकेपणाने पोहोचवण्यासाठी शिक्षकांना भाषेचे उत्तम ज्ञान असणे गरजेचे आहे, असे मत लेखिका माधुरी पुरंदरे यांनी व्यक्त केले.
ज्ञानप्रकाश प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘वाचू आनंदे – लिहू नेटके’ या विषयावर पुरंदरे बोलत होत्या. पत्रकार अतुल देऊळगावकर, सतीश नरहरे व सविता नरहरे या वेळी उपस्थित होते. मातृभाषेतून शिक्षणामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. सहज भाषा प्रभुत्वासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. मुलांचा वाचनाकडे कल कसा वाढेल व ते जे लिहितात त्यात नेटकेपणा कसा येईल? याकडे पालकांनीही लक्ष दिले पाहिजे, असे सांगताना मुलांची जबाबदारी शाळेवर ढकलून मोकळे होणाऱ्या पालकांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली.
औपचारिक चौकटीच्या शिक्षणात आपली मुले अडकवून न ठेवता ते आनंदी वातावरणात कसे शिकतील, याकडे पालकांनीही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. देऊळगावकर यांनी सर्वच भाषा विषयात विद्यार्थ्यांचा अभ्यास योग्य पध्दतीने घेतला जात नाही. भाषेच्या अभ्यासावरच मुलांचे भवितव्य अवलंबून असते. पालकांनी व शिक्षकांनी बालपणापासूनच या बाबींकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. सूत्रसंचालन विशाल माळेगावकर यांनी केले.