* ठाणे, नवी मुंबईत कोटय़वधी रुपयांचा कर भरणा
* हजारो व्यापाऱ्यांची नोंदणी सुरू
 स्थानिक संस्था कराला (एलबीटी) हरकत घेत राज्य सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उगारणाऱ्या ठाणे, नवी मुंबईतील व्यापाऱ्यांना अखेर उपरती होऊ लागली असून या दोन्ही शहरांमधील महापालिकांमधून कोटय़वधी रुपयांच्या कराचा भरणा सुरू झाल्याने या आंदोलनात मोठी फूट पडू लागल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. नवी मुंबई महापालिकेने उपकराच्या माध्यमातून नोंदीत असलेल्या सुमारे २२ हजार व्यापाऱ्यांची एलबीटी अंतर्गत परस्पर नोंदणी केली आहे, तर ठाण्यातही गेल्या काही दिवसांत २२०० व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे रीतसर नोंदणी करून घेतली आहे. जकात बंद केल्यामुळे उत्पन्न कमी होईल आणि विकासकामांवर परिणाम होईल, अशी ओरड करणाऱ्या शिवसेना-भाजपच्या नेत्यांना या नोंदणीमुळे एक प्रकारे चपराक बसली असून ठाण्यात एलबीटीच्या माध्यमातून सुमारे आठ कोटी रुपये तर नवी मुंबईत १३ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. विशेष म्हणजे, एलबीटीला विरोध करत ठाणे बंदची हाक देणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये गट पडले असून शुक्रवारी शहरातील प्रमुख बाजारपेठा सुरू असल्याने एलबीटीला होणारा विरोध हळूहळू मावळू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.
जकात बंद करत राज्य सरकारने एलबीटीचा आग्रह धरल्यामुळे सध्या या कराविरोधात राज्यभरातील व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मुंबईपाठोपाठ ठाणे, नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनीही एलबीटीला विरोध करत काही दिवस दुकाने बंद ठेवण्याचा प्रयोग करून पाहिला. मात्र, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दुकाने उघडली आणि सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला. जीवनावश्यक वस्तूंना एलबीटी लागू होत नसतानाही एपीएमसीतील ठरावीक व्यापाऱ्यांचा गट अन्नधान्य, कांदा-बटाट, भाजीपाला, फळांच्या व्यापाऱ्यांवरही दबाव वाढवीत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. एपीएमसीमधील सुमारे सहा हजार व्यापाऱ्यांपैकी जेमतेम १५० व्यापाऱ्यांना एलबीटी लागू होतो. असे असताना अन्नधान्याच्या बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांनी ग्राहकांचा रोष ओढावून घेतल्याचे चित्र दिसून आले.
व्यापाऱ्यांमध्ये फूट
दरम्यान, एलबीटीला विरोध करत बंदचे हत्यार उगारणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये आता फूट पडू लागली असून ठाणे तसेच नवी मुंबई महापालिकेते एलबीटीअंतर्गत मोठय़ा संख्येने व्यापाऱ्यांची नोंदणी सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. ठाणे महापालिकेने गेल्या काही दिवसांत सुमारे अडीच हजार व्यापाऱ्यांची एलबीटीअंतर्गत नोंद केली आहे. तसेच व्हॅटअंतर्गत नोंदित असलेल्या सुमारे १८ हजार व्यापाऱ्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील आठवडय़ाभरात ठाणे महापालिकेच्या तिजोरीत सुमारे साडेसात कोटी रुपयांचा करभरणा झाल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपर्यंत एलबीटीचा भरणा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर व्याज आकारणी केली जाते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर कराचा भरणा सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. जकात बंद झाल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याची तक्रार करत आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेना-भाजपच्या सदस्यांना यामुळे एक प्रकारे चपराक बसली आहे.

नवी मुंबईत १३ कोटी रुपये जमा
नवी मुंबई महापालिकेने उपकराच्या माध्यमातून नोंदित असलेल्या सुमारे २२ हजार व्यापाऱ्यांना एलबीटी क्रमांक देऊ केला असून आतापर्यंत महापालिकेच्या तिजोरीत सुमारे १३ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे, अशी माहिती एलबीटी विभागाचे प्रमुख सुधीर चेके यांनी वृत्तान्तला दिली. एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी एलबीटीविरोधात आंदोलन सुरू केले असले तरी इतर भागातून मात्र व्यापारी मोठय़ा प्रमाणावर कराचा भरणा करू लागले आहेत, असेही चेके यांनी स्पष्ट केले.