विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण निर्माण व्हावेत, समाजातील प्रश्नांची त्यांना जाणीव व्हावी या हेतूने येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे विद्यार्थी परिषद सदस्यांसाठी आयोजित नेतृत्व विकास कार्यशाळेत विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगपती दिग्विजय कपाडिया यांनी समाजाला नवी दिशा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेतृत्व गुणाचा विकास करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपण कर्तृत्वाच्या माध्यमातून अधिकाधिक समाजोपयोगी कार्य केल्यास त्याची निश्चितच दखल घेतली जाते असेही त्यांनी सांगितले. ‘नेतृत्व विकास आणि व्यक्तीमत्व विकास’ विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अरूण जामकर यांनी नेतृत्व करताना आपल्या सोबतच इतरांनाही घेऊन  प्रगती साधता येणे आणि याच दृष्टिकोनातून रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील सुसंवाद वाढविण्यसााठी त्यांच्याशी योग्य समन्वय घडवून आणण्यासाठी विद्यापीठातर्फे अभ्यासक्रमामध्ये ‘संवाद कौशल्य’ विषयाचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगितले. प्रास्तविक विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. संदीप गुंडरे यांनी केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.
कार्यशाळेत सलिल पुळेकर यांचे ‘युवाशक्ति व उत्साह’ तर, कुलगुरू प्रा. डॉ. अरूण जामकर यांचे ‘ताण-तणावाचे व्यवस्थापन’ विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. संदीप गुंडरे यांनी ‘रॅगिंग एक शाप’, डॉ. स्वप्नील तोरणे यांचे ‘संवाद: यशस्वितेची गुरूकिल्ली’, सुनील पोटे यांचे ‘सामाजिक कार्याचे महत्व’ या विषयांवर व्याख्यान झाले. पोटे यांनी समाजातील एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी आपणास एकमेकांमध्ये आपुलकी, जिव्हाळा निर्माण केला पाहिजे. माणसाने फक्त स्वत:चा विचार न करता समाजाचेही आपण देणे लागतो. या भावनेतून आपल्याकडील ज्ञान, कौशल्य आणि अनुभव सर्वाना उपलब्ध करून दिल्यास त्याचा भावी पिढीस उपयोग होतो, असे त्यांनी नमूद केले.
समारोपप्रसंगी कुलसचिव डॉ. के. डी. गर्कळ यांनी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.