गोदावरी प्रदुषणासह ग्रामीण भागातील जल प्रदूषणाविषयी विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि प्राध्यापक यांच्यात जनजागृती करण्याचे काम प्राचार्य डॉ. दत्ता फरताळे हे व्याख्यानांव्दारे करीत असून शहर परिसरातील विविध विद्यालयांमध्ये यासंदर्भात त्यांची व्याख्याने झाली आहेत.
नाशिकरोड येथील के.जे. मेहता हायस्कुलमध्ये झालेल्या व्याख्यानास नाशिक ग्रामीण व शहरी विभाग, इगतपुरी, पेठ, सिन्नर, त्र्यंबक, दिंडोरी, सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील मुख्याध्यापक सहभागी झाले होते. डॉ. फरताळे यांनी गोदावरीचे प्रदूषण गंगापूर गाव, सातपूर औद्योगिक वसाहतीचे रसायनमिश्रीत पाणी, एसटी कॉलनी, चोपडा लॉन्सजवळील गटार, मल्हार खाणजवळील गटार, वाघाड नाला, टाळकुटेश्वर पुलाजवळची गटार यामुळे गोदावरीचे होणारे प्रदूषण, शिवाय गोदावरीच्या प्रदूषणात नासर्डी नदीचा सहभाग यांचा उल्लेख केला. तपोवन व पंचक येथील मलनिस्सारण केंद्राचे पाणीही गोदावरीत सोडले जाते. त्यातच गोदाघाटावर कपडे तसेच वाहने धुण्यामुळे प्रदूषणात भर पडते. नदीत टाकण्यात येणारा कचरा व निर्माल्यामुळे पाण्यात जंतु विसर्ग होतो. गोदावरीच्या पाणी परीक्षणात रसायनांची मोठी वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले असून असे पाणी आरोग्याला धोकादायक असल्याचेही डॉ. फरताळे यांनी नमूद केले.
चांदवड येथे आयोजित व्याख्यानास सटाणा, देवळा, मालेगाव ग्रामीण आणि शहरी विभाग व चांदवड तालुक्यातील मुख्याध्यापक सहभागी झाले होते. पृथ्वीचा ७१ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. परंतु त्यातील ९७ टक्के पाणी समुद्रात आहे. २.७ टक्के पर्यावरणात तर, फक्त एक टक्कापाणी सजीवांसाठी उपलब्ध आहे. माणसाला दररोज सरासरी ४० लिटर पाणी लागते. हे पाणी शुध्द असणे आवश्यक आहे. परंतु आजकाल सर्व नद्या प्रदूषणयुक्त झालेल्या आढळून येतात. पाण्यात जीवजंतु आढळल्याने अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. गोदावरी खोऱ्यातील शेती प्रदूषित पाण्यामुळे धोक्यात आली असून त्यात वेगवेगळ्या खनिज द्रव्यांचे प्रमाण वाढलेले आढळून आले आहे. सुपीक जमीन खारट होत आहे. अतीप्रदूषित पाणी व भरमसाठ रासायनिक खते यामुळे जमीन हळूहळू नापीक होण्याची शक्यता आहे. भविष्यात अशा ठिकाणी कोणत्याच वनस्पतींची वाढ होणार नाही, असा धोकाही त्यांनी सांगितला.
गोदावरी खोऱ्यातील शेतीच्या उत्पन्नात काही ठिकाणी चौपट घट झालेली आढळून येते. अनेक नद्यांमध्ये सांडपाणी, कारखान्यांचे रसायनमिश्रीत पाणी, मलमूत्र सोडले जाते. त्यामुळे प्रदूषण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. पेठे विद्यालयात स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बालवयात शिकलेल्या गोष्टी आपण आयुष्यभर विसरत नसल्याने जल प्रदूषण मुक्तीचे धडे या वयातच गिरविणे आवश्यक असल्याचे सांगितले. एक वेळ अन्न नसेल तर काही काळ आपण जिवंत राहु शकतो. परंतु पाण्याशिवाय जिवंत राहता येत नाही. आपल्या शरीरात ९० टक्के पाणी आहे. त्यामुळे स्वच्छ व शुध्द पाण्याची आपणास गरज असते. नदी स्वच्छ कशी राहील याकडे प्रत्येकाने लक्ष देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. गोदावरीला प्रदूषणापासून वाचविण्याची अत्यंत गरज आहे. त्यासाठी शासन, समाज, सामाजिक संस्था या सर्वानी मिळून एक सामाजिक जबाबदारी म्हणून गोदावरीचे प्रदूषण थांबविले पाहिजे असे आवाहन डॉ. फरताळे यांनी केले. यावेळी फरताळे यांनी गोदावरी प्रदूषणाविषयी तयार केलेली चित्रफीत दाखवली.