दिवा शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या दिवा विकास प्रतिष्ठानतर्फे दिवा स्टेशनाच्या पूर्वेकडील आपला जत्रोत्सव मैदानावर भव्य जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील लोकगीते, सुस्वर भजने, मराठी लावण्यांचा बहारदार कार्यक्रम, ग्रुप डान्स आदी भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले असून दररोज काढण्यात येणाऱ्या लकी ड्रॉमधून भाग्यवान महिलांना आकर्षक पैठणी दिली जात आहे.
मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आपटे या दाम्पत्याचा मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजयकुमार बांदल यांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘अरण्यातील प्रकाशवाटा’ ही फिल्म दाखविण्यात आली. या वेळी महोत्सवाचे आयोजक मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील व तुषार पाटील यांच्यातर्फे सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून आर्थिक साहाय्य करण्यात आले. दिवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णवाहिका, रक्तदान शिबीर, विनामूल्य नेत्रचिकित्सा शिबीर, चष्मेवाटप, गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आदी सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. या वेळी सामाजिक कार्यकर्ते संजय दळवी, अनेक पत्रकार तसेच मान्यवर आवर्जून उपस्थित होते. डॉ. प्रकाश आमटे यांनी, आनंदवनातील रुग्णालय उभारणीच्या कार्यासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या दिवा विकास प्रतिष्ठानचे आभार मानले.
‘आजची सत्यगीतं’ प्रकाशीत
आपले स्वातंत्र्य सीमेवर लढणाऱ्या सैन्यामुळे अबाधीत आहे. प्रत्येक भारतीयाने त्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘लक्ष्य’ फाऊंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी रविवारी ठाण्यात केले. सामाजिक कार्यकर्ते सत्यजीत शहा यांच्या ‘आजची सत्यगीतं’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ कवी अशोक बागवे, माजी  आमदार संजय केळकर, ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर-पांडे, मिलिंद बल्लाळ, प्रा. प्रदीप ढवळ यावेळी उपस्थित होते. ठाण्यातील प्रदुषण, वाहतूक कोंडी, भटके कुत्रे आदी समस्यांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या सत्यजीत शहा यांच्या या पहिल्याच संग्रहातील कवितांमध्ये वास्तव परिस्थितीचे चित्रण आहे. शारदा प्रकाशनने प्रकाशीत केलेल्या या काव्य संग्रहाची पहिली आवृत्ती संपेल, हे गृहीत धरून त्यातील दहा टक्के उत्पन्न सत्यजीत शहा यांनी विद्यादान सहाय्यक मंडळास दिले. निधीचा धनादेश समारंभातच संस्थेचे भाऊ नानिवडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.