हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी हात किंवा पायाची नस वापरल्यास ती परत ब्लॉक होण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. परंतु ‘लिमा-रिमा-वाय’ या पद्धतीचा वापर केल्यास तो धोका नसतो. या पद्धतीची शस्त्रक्रिया ही शंभर टक्के यशस्वी असून मध्यभारतात केवळ केअर हॉस्पिटलमध्येच उपलब्ध असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक व ज्येष्ठ हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. वरुण भार्गव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. भार्गव म्हणाले, डाव्या कोरोनरीचा मुख्य भाग म्हणजे मेनस्टेम ब्लॉक असेल तर बायपास सर्जरी हाच उपाय असतो. जेव्हा बलून अ‍ॅंजिओप्लास्टिने कोरोनरी ओपन करणे शक्य नसते, अशावेळी बायपास शस्त्रक्रिया करावी लागते. यासाठी बहुतांश डॉक्टर रुग्णांच्या पायातील ‘सॅफेनस व्हेन’ किंवा हाताच्या मनगटाजवळची ‘रेडियल आर्टरी’ बायपाससाठी वापरतात. परंतु ही नस पुन्हा ब्लॉक होण्याची शक्यता असते. शिवाय रुग्णाच्या पायाची किंवा मनगटाजवळची व्हेन कापली जात असल्याने रुग्णाला काही आठवडे खाटेवर काढावे लागतात. परिणामी रुग्णालयाचा खर्चही वाढतो.
बायपाससाठी स्टर्नमच्या दोन्ही बाजूच्या लिमा (लेफट इंटर्नल मॅमरी आर्टरी) आणि रिमा (राईट इंटर्नल मॅमरी आर्टरी) या नसा वापरल्यास भविष्यात ‘ब्लॉक’ होण्याचे प्रमाण फार कमी होते. यास ‘लिमा-रिमा-वाय’ पद्धती असे संबोधले जाते. या शस्त्रक्रियेला ३ ते ४ तासाचा अवधी लागतो. शिवाय प्रचलित खर्चही कमी येतो. दीड लाख रुपयामध्ये ही शस्त्रक्रिया होते. शस्त्रक्रियेसाठी जखमही कमी होते. दिनचर्येत फारसा फरक पडत नाही. पाश्चात्य देशात या शस्त्रक्रियेचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. डॉ. शुधांशु भट्टाचार्य यांनी ही शस्त्रक्रिया शोधून काढली. केअर हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच वर्षांत लिमा-रिमा-वाय पद्धतीने २५० शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेही डॉ. भार्गव यांनी सांगितले. यावेळी हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सौरभ वर्षने, डॉ. अच्युत खांडेकर, डॉ. राम घोडेस्वार, डॉ. विपूल सेना, हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक रवी मनाडिया उपस्थित होते.