खारघर टोलनाक्याच्या करवसुली व वाहतूक कोंडी या दोन्ही उग्र समस्यांतून स्थानिक वाहनचालकांची मुक्ती होण्यासाठी कळंबोली ते खारघर हा सेवारस्त्याचा तोडगा सिडकोने काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा रस्ता सिडकोने बांधल्यास महामार्गावर भरधाव वेगात होत असलेली दुचाकी व चारचाकी वाहनांना सुरक्षेची नवी वाट मिळेल. परंतु याला अडसर सिडकोचा नियोजनशून्य कारभार आहे. जोपर्यंत लोकहिताच्या कामांची मागणी होत नाही, तोपर्यंत सिडको संबंधित प्रकल्पाकडे लक्ष देत नाही या जनविरोधी वृत्तीमुळे सामाजिक संस्थांना या सेवारस्त्याच्या मागणीसाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.
पनवेल तालुका व खारघर-बेलापूर या परिसराला जोडणारा शीव-पनवेल महामार्ग या व्यतिरिक्त अन्य मार्ग येथे नाही. शहरांचे शिल्पकार अशी बिरुदावली मिरविणाऱ्या सिडकोने वसाहती वसवून वीस वर्षे झाली, मात्र वसाहतींना आपसात जोडणारा सेवारस्ता अद्याप बनविला नाही हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. सध्या पनवेलकर खारघर व कामोठे टोलनाक्याच्या करवसुलीपेक्षा तेथील वाहतूक कोंडीला त्रस्त झाले आहेत. शुक्रवार सायंकाळ ते शनिवारी सकाळपर्यंत मुंबईबाहेर जाताना कामोठे टोलनाक्यावर आणि रविवारी सायंकाळी खारघर टोलनाक्यावर अक्षरश: वाहनचालक टोलनाक्यामधील कोंडीच्या नावाने बोंब ठोकत असतात. पथकर घ्या, मात्र वाहतूक कोंडी नको अशी याचना या वाहनांमधील प्रवाशांची असते.
सध्या कळंबोली सर्कल ते रोडपाली लिंकरोडवरील  पेट्रोलपंपापर्यंत जुना सेवारस्ता आहे. मात्र त्याची दयनीय अवस्था आहे. या रस्त्याचा काही भाग मार्बलमार्केमध्ये येतो. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी सिडकोने साडेसात कोटी रुपये खर्च करण्यासाठी प्रस्ताव बनविला आहे. मात्र ही फाइल बंदच राहिली आहे. यावर सिडकोने कोणतेही ठोस पाऊल अजूनही उचलले नाही. यामध्ये भूखंडासारखी कोणती कमाई नसल्याने असे असावे कदाचित असे रहिवाशांचे म्हणणे आहे. सध्या येथे पायवाट आहे. मात्र ही पायवाट पावसाळ्यात बंद होते. सिडकोने सुमारे १५ कोटी रुपये खर्च केल्यास हा सेवारस्ता खारघर व कळंबोली, कामोठे, पनवेल, तळोजा या परिसरातील स्थानिक वाहनचालकांची कोंडी सोडविणारा मोठा दुवा ठरू शकतो. वाहनांसाठी २५ कोटी रुपये सिडकोने खर्च करून हा सेवारस्ता बांधल्यास टोल व कोंडी हे दोनही प्रश्न निकालात निघतील. याबाबत सिडकोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, वसाहती जोडण्याची जबाबदारी सिडकोची आहे. वसाहती वसविताना झालेल्या नियोजनाअभावी हे काम राहिले आहे. मात्र सध्या ही काळाची गरज बनली आहे. आम्हालाही त्याची कल्पना आहे. अशी मागणी रहिवासी व लोकप्रतिनिधींनी केल्यास त्यावर सिडको नक्कीच विचार करेल.
रहिवाशांची मागणी   
खारघरच्या रहिवाशांनी मिळून स्थापन केलेल्या खारघर फोरमच्या लिना गरड यांनी स्पॅगेटी ते पुरुषार्थ पेट्रोलपंपापर्यंत सिडकोने सेवारस्ता (सíव्हसरोड) करून द्यावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी रहिवाशांची लवकरच स्वाक्षरी मोहीम फोरमतर्फे घेण्यात येणार आहे. अशीच मागणी रोडपाली नोडच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या प्रवाशांची आहे. अगदी हाकेच्या अंतरावर खारघर दिसत असतानाही पोहचण्यासाठी लागणारा विलंबाचा प्रवासावर सिडकोने प्रवाशांचा हक्काचा सेवारस्ता दिलाच पाहिजे असे दिनेश मंत्री यांनी सांगितले.