निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारांमध्ये सुरू असलेली धावपळ गुरुवारी मतदानानंतर थांबली. सर्वच प्रमुख उमेदवार विजयाचा दावा करीत असले तरी मतदारांचा उत्साह आणि वाढलेली मतदानाची टक्केवारी यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मतदानयंत्रात काय दडले आहे हे कळायला एक महिन्याचा अवधी असल्याने या काळापर्यंत उमेदवारांचा जीव टांगणीला लागणार आहे.
सोळाव्या लोकसभेसाठी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात लोकसभेच्या १० जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. विदर्भ हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मधल्या काळात समीकरणे बदलली. काँग्रेसचे विभाजन होऊन निर्माण झालेली राष्ट्रवादी काँग्रेस, पारंपरिक दलित मतांचे बसपासह विविध रिपाइं गटात झालेले विभाजन आणि प्रस्थापितांनाच उमेदवारी देण्याचे पक्षाचे धोरण यामुळे विदर्भाचा गढ केव्हा ढासळला हे काँग्रेसच्या नेत्यांना कळलेच नाही. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर ही समीकरणे आणखी बदलली. या साऱ्या पाश्र्वभूमीवर यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, रिपाइं आणि आम आदमी पार्टी या प्रमुख पक्षांसह इतरही काही पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. आचारसंहितेचा बडगा, निवडणूक निरीक्षकांची करडी नजर या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्वच पक्षांनी गेल्या वीस दिवसात प्रचार यंत्रणा राबविली. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनी सभाही घेतल्या. जातीपातीच्या राजकारणाची जुळवाजुळव करण्यात आली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच पक्षांनी त्यांच्या उमेदवारांसाठी जोर लावला. तरुण मतदारांना वळविण्यासाठी प्रयत्नही झाले. या सर्व पाश्र्वभूमीवर विदर्भातील सर्वच लोकसभा मतदारसंघांत चुरशीच्या लढती झाल्या. विशेष म्हणजे यावेळी विदर्भातील काही जिल्ह्य़ात आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष निवडणुकीत निर्णायक स्थितीत आला. नागपुरात काँग्रेसचे विलास मुत्तेमवार, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी आणि आपच्या अंजली दमानिया यांच्यासह एकूण ३३ प्रमुख उमेदवारांसह विदर्भात २०१ उमेदवार रिंगणात होते. प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे भंडारा-गोंदिया आणि मुकुल वासनिक यांच्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे देशाचे लक्ष वेधले गेले.
गेल्यावेळेच्या निवडणुकीपेक्षा मोठय़ा प्रमाणात मतदान झाले. विदर्भातील अनेक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारीही अनेकांना धक्का देणारी ठरली. सर्वच प्रमुख उमेदवारांनी विजयाचे दावे केले असले तरी मतदान यंत्रात काय दडले आहे हे एक महिन्याने म्हणजे १६ मे ला कळणार असल्याने उमेदवारांची धाकधूक आणखीच वाढली आहे. एक महिन्याचा अवधी असला तरी राजकारणात इतका वेळ क ोणालाच थांबणे शक्य नसल्याने कुणी पोलिसांच्या गुप्तचर खात्याचा हवाला देत, तर कुणी राजकीय विश्लेषकांचा अंदाज विचारात घेऊन ‘कोण जिंकणार, कोण हरणार’ याबाबत अंदाजही व्यक्त केले जात आहेत. सर्वच उमेदवार त्यांचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघांबाबत प्रतिकूल परिस्थितीचे वर्णन करीत आहेत. कुणाला किती मते मिळतील, कुठल्या भागात कोणता उमेदवार चालला, याबाबत कार्यकर्ते चर्चा करीत आहेत. तर्कवितर्कोचा हा खेळ आणखी एक महिना चालणार आहे. तोपर्यंत उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.