महाशिवरात्रीच्या दिवशी प्रसिद्ध घारापुरी (एलिफंटा) बेटावरील शिविलगाचे दर्शन घेण्यासाठी ६० ते ७० हजारांपेक्षा अधिक शिवभक्त हजेरी लावत असून, या भक्तांना घारापुरी येथे नेण्यासाठी उरणच्या मोरा जेटीवरून प्रवासी लाँचची व्यवस्था महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून केली जाते. मात्र, यावर्षी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने लाँच मालक संस्थेकडे या मार्गावरून लाँच सेवा देण्याची मागणी केली होती. मात्र ती मान्य झाली नाही. त्यामुळे यावर्षी मोरा ते घारापुरी हा जलप्रवास मच्छीमार मचव्याने करावा लागणार आहे.
महाशिवरात्रीनिमित्ताने पाषाणात कोरलेल्या शिविलगाचे तसेच महेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रायगड जिल्ह्य़ातील विविध भागातून हजारो शिवभक्त घारापुरी येथे जातात. या शिवभक्तांना घारापुरी येथे प्रवास करता यावा याकरिता महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या वतीने लाँचची व्यवस्था केली जाते. त्यामुळे भक्तांना सुखरूप प्रवास करता येतो. लाँचने प्रवास करणे सोयीचे असल्याने लाँच मालकांकडून निविदा मागवून जलप्रवासाची सोय करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता.
मात्र या मार्गावर काही दिवसांपूर्वी लाँचवर बोर्डाने कारवाई केल्याने त्याचा निषेध म्हणून लाँच मालकांनी मोरा-रेवस- मुंबईदरम्यानची लाँच सेवा अचानकपणे बंदही ठेवली होती.